गोंदिया, दि. १८ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील आठवडीबाजार, चित्रपट गृहे, जलतरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे व म्युझियम ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत क्षेत्रात भरणारे आठवडे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गुरांच्या व इतर बाजारांचा समावेश आहे.
१३ मार्च २०२० पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून त्याबाबतची नियमावली घोषित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने जिल्ह्यातील चित्रपट गृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे व म्युझियम ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे सूचित करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत कळविण्यात आले आहे.
लग्न, समारंभ कौटुंबिक स्वरुपात साजरे करण्याचे आवाहन
गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक आदेश १८९७ लागू करण्यात आला आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात होणारे स्वागत समारोह, साखरपुडा, लग्न, भागवत कथा, वाढदिवस, मिटिंग इत्यादी कार्यक्रम पुढे ढकलावेत किंवा अनावश्यक गर्दी टाळून कौटुंबिक स्वरुपात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांची गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात आयोजित स्वागत समारोह, साखरपुडा, लग्न, भागवत कथा, वाढदिवस, मिटिंग इत्यादी कार्यक्रम पुढे ढकलावेत. हे कार्यक्रम पुढे ढकलणे शक्य नसल्यास अनावश्यक गर्दी टाळून कौटुंबिक स्वरूपामध्ये साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये व लॉन मालक यांनी ३१ मार्च २०२० पर्यंत कोणत्याही कार्यक्रमाचे आरक्षण स्वीकारू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.





