39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ जिल्हयात दहा व्यक्ती होम क्वारंटाईन देखरेखीखाली

जिल्हयात दहा व्यक्ती होम क्वारंटाईन देखरेखीखाली

Ø कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत बैठक

0
342

भंडारा,दि. 18 :- भंडारा जिल्हयातील विदेशातून परत आलेल्या व्यक्तीची संख्या दहा झाली असून त्यांच्यावर घरातच विलगीकरण सेवा देण्यात येत आहे. निदानाअंती जिल्हयात एकही कोरोना बाधित व्यक्ती आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली. शासकीय शाळेमधील शिक्षकांमार्फत घरोघरी जाऊन वैयक्तिक  स्वच्छता, परिसर स्वच्छता, गावात जनजागृती करण्यात येत असून गर्दीच्या ठिकाणी जनतेने जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, नितीन सदगिर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गामस्तरावर तलाठी व ग्रामसेवकांनी स्वच्छतेबाबत नागरिकांना जागृत करावे, कोरोना कोविड 19 बाबत प्रशिक्षण 20 मार्चला घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विलगीकरण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे 20 खाटांचे स्थापन करण्यात आले आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सर्व पर्सनल प्रोटेक्टीव्ह इमप्लीमेंट उपलब्ध करुन देण्यात आले आहे आणि व्हेंटीलेटर व औषधांची व्यवस्था करण्यात आलेली असून सुसज्ज असे कक्ष स्थापन करण्यात आले, असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगितले. तसेच जिल्हा स्तरावर 60 खाटांचे क्वारंटाईन कक्ष नवीन नर्सिंग स्कूल येथे स्थापन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर 3 व तालुकास्तरावर प्रत्येकी 1 आणि गावपातळीवर रॅपीड रिस्पान्स टिम तयार करण्यात आली आहे. विलगीकरण केलेल्या संशयितांचे दररोज पाठपुरावा करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व धार्मिक नेत्यांची मदत घेण्याचे सांगण्यात आले. तसेच शहराच्या ठिकाणी जमावबंदी आदेश दोन दिवसात लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. खाजगी वैद्यकीय संस्थांनी सुध्दा व्हेंटीलेटर पुरविण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येकांनी हात स्वच्छ धुवावे व सॅनिटायझरचा उपयोग करावा. तसेच करोना प्रतिबंधात्मक उपायाबाबत ऑडिओ व व्हिडिओ द्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व मार्केट बंद करण्याचे आदेश देण्यात आले.