गोंदिया,दि.19: कोरोना विषाणूच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी शासन व यंत्रणा अतोनात प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे बाधित रूग्ण आढळले असले तरी गोंदिया जिल्ह्यात अद्यापपर्यत एकही बाधित रूग्ण सापडला नाही. असे असतानाही संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासन पुर्णत: खबरदारी घेत आहे. गोंदिया जिल्ह्यात ५१ जण विदेशातून प्रवास करून दाखल झाले आहेत. त्यांच्या संपर्कात १८३ व्यक्ती आले आहेत. त्यामुळे एकूण २३४ व्यक्तींना होम कॉरेन्टाईनचा सल्ला देण्यात आला असून आरोग्य प्रशासन त्यांच्या नजर ठेवून आहे.
कोरोना विषाणूचा संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासन पूर्णत: सज्ज आहे. ऑयसोलेशन कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. संशयित रूग्णांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे. अद्यापपर्यत गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा एकही बाधित रूग्ण आढळला नाही. तरीही प्रशासनाकडून पूर्णत: खबरदारी घेतली जात आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये ५१ व्यक्ती विदेशातून प्रवास करून दाखल झाले आहेत. विदेशातून प्रवास करून आलेल्यांच्या संपर्कात १८३ व्यक्ती आल्याचे आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण २३४ व्यक्तींना होम कॉरेन्टाईन (घरीच अलगीकरण) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकीत्सक गोंदिया यांच्याकडून देण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे सांगून डॉ. बलकवडे म्हणाल्या, कोरोना विषाणूबाबत अफवा पसरविणाऱ्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी. प्रत्येक व्यक्तीने हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे. शक्यतोवर हस्तांदोलन करणे टाळावे. नागपूर किंवा रायपूर येथील विमानतळावर परदेशातून आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती आरोग्य विभागाने घ्यावी असे त्या म्हणाल्या.
तिरोड्यात एकही संशयित नाही; ते वृत्त अफवाच
काही प्रसार माध्यमांनी आज (ता.१९) वृत्ताच्या माध्यमातून तिरोडा येथे १६ व्यक्ती कोरोना विषाणूचे संशयित असल्याचे प्रकाशित केले. या वृत्तामुळे तिरोडा तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. वृत्ताची खबरदारी म्हणून आ.विजय रहांगडाले यांनी तातडीची बैठक बोलावून या संदर्भात आढावा घेतला. मात्र, तिरोडा तालुक्यात एकही व्यक्ती संशयित नसल्याची माहिती आरोग्य व तालुका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे तिरोडा तालुक्यात संशयित रूग्णांचे ते वृत्त एक अफवाच ठरले आहे.
अफवा पसरविणार्या माध्यमांवर गुन्हा दाखल
तिरोडा तालुक्यातील माल्ही येथे कोरोना विषाणू बाधित व्यक्ती आढळल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात आले. मात्र, तिरोडा तालुक्यात एकही संशयित किंबहुना बाधित रूग्ण नसल्याची खात्री आहे. त्यामुळे चुकीचे वृत्त प्रकाशित करून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी तालुका प्रशासनाकडून एका वृत्तवाहिनीसह अज्ञात इसमावर तिरोडा पोलिस ठाण्यात काल (ता.१८) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
अफवांवर विश्वास ठेवू नका : जिल्हाधिकारी
कोरोना विषाणू संसर्गाची देश व राज्यावर एक आपत्ती आली आहे. त्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी खबरदारी घेवून उपाययोजनेला सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र, विविध माध्यमातून विषाणूचा संसर्गाला घेवून अफवात्मक संदेश पोहोचविले जात आहेत. म्हणून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये परंतु, खबरदारी निश्चित घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अफवा पसरविणार्यांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे अफवा पसरवू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
२१८५ प्रवाशांचे रेल्वे आरक्षण रद्द
देश व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे प्रवास टाळणे गरजेचे झाले आहे. परिणामी नागरिकही प्रवासापासून दुर राहत आहेत. त्यातच गोंदिया रेल्वे स्थानकातून प्रवासासाठी आरक्षित केलेल्या तिकीट देखील रद्द करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. गेल्या ४ दिवसात गोंदिया रेल्वेस्थानकातून २१८५ प्रवाशांनी आपले आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाकडून आरक्षण रद्द करण्यात आलेल्या प्रवाशांना १० लाख रूपये परत करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेचे महसूल निरीक्षक अरविंद साव यांनी दिली.





