वाशिम, दि. १९ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून परदेशातून व पुणे, मुंबई सारख्या महानगरातून गावामध्ये परतलेल्या नागरिकांची माहिती संबंधित गावाच्या पोलीस पाटलांनी नियमितपणे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार, कार्यकारी दंडाधिकारी यांना कळवावी. तसेच [email protected], [email protected] आणि [email protected] या ई-मेलवर सुध्दा सदर माहिती पाठवावी, असे आदेश जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांना दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम १९६७ मधील कलम ६(१) अन्वये हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत परदेशातून व पुणे, मुंबई यासारख्या महानगरातून गावाकडे परत येणाऱ्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे परदेशातून, मुंबई, पुणे अशा महानगरातून परत आलेल्या नागरिकांची माहिती दररोज नियमितपणे तालुका दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी यांना कळवावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पोलीस पाटलांना दिले आहेत.
स्वतःहून तपासणी करून घ्या; १५ दिवस घरातच थांबा !
परदेशातून अथवा पुणे, मुंबई सारख्या महानगरातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने स्वतःहून जवळच्या सार्वजनिक रुग्णालयात जावून आरोग्य तपासणी करावी. तसेच त्यांनी पुढील १५ दिवस घरातून बाहेर न पडण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २(१) अन्वये दिले आहेत. या नागरिकांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक रुग्णालये सुसज्ज ठेवावीत. प्रत्येक रुग्णालयात डॉक्टर हजर असणे बंधनकारक आहे. तसेच औषधांची पुरेशी व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
ट्रॅव्हल कंपन्यांनी प्रवाशांची माहिती देण्याचे आदेश
पुणे, मुंबई सारख्या महानगरातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशाचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, प्रवाशी ज्या ठिकाणी उतरला, प्रवाशाचा मोबाईल क्रमांक, गाडी ज्या शहरातून आली त्या शहराचे नाव व गाडी क्रमांक याविषयीची माहिती सर्व ट्रॅव्हल कंपन्यांनी प्रशासनाला पुरविण्याचे आदेश साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २ (१) अन्वये देण्यात आले आहेत. [email protected], [email protected] आणि [email protected] या ई-मेलवर ही माहिती पाठवावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम १९६७ मधील कलम ६ (१) अन्वये तसेच साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २ (१) अन्वये देण्यात आलेल्या या आदेशाची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सर्व गावांमध्ये दवंडी, मुनादी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सर्व ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.





