जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक ऑनलाईन नामांकन

0
8

गोंदिया दि.६: गेल्या महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून सर्वांना प्रतीक्षा असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक विभागाने गुरूवारी जाहीर केला. त्यामुळे येत्या ३0 जूनला मतदान असल्याने अल्प कालावधीत उमेदवारांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करून त्यांचे नामांकन व प्रचारकार्य करावे लागणार आहे. यासाठी राजकीय वातावरण आता तापत आहे. दरम्यान निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या तयारीची माहिती शुक्रवारी पत्रकारांना दिली.
यावेळी प्रथमच सर्व उमेदवारांचे नामांकन भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे गाजावाजा करीत नामांकन दाखल करण्यासाठी जाताना केले जाणारे शक्तीप्रदर्शन आता बंद होणार आहे. कॉम्प्युटरवर इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून भराव्या लागणार्‍या या लांबलचक नामांकनामुळे ग्रामीण उमेदवारांची थोडी तारांबळही उडण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले की, ऑनलाइन नामांकनासोबत जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याबद्दलच्या शपथपत्रासोबतच उमेदवाराला स्वत:ची आणि कुटुंबातील व्यक्तिंच्या संपत्तीचे विवरण द्यावे लागणार आहे. तसेच दाखल गुन्ह्यांविषयीची माहिती तसेच शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे शपथपत्र देणे अनिवार्य राहणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ३ लाख रुपये तर पंचायत समिती निवडणुकीसाठी २ लाख रुपयांची खर्च र्मयादा ठरवून देण्यात आली आहे.विधानसभा-लोकसभा निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही पहिल्यांदाच निरीक्षकांची (ऑब्झर्वर) नियुक्ती करण्यात आली आहे. दोन तालुक्यांमिळून एक असे चार निरीक्षक जिल्ह्यात राहणार आहेत.