भारताचा नकाशा कधीही बदलू शकतो-भागवत

0
15

नागपूर दि.५- ‘इंग्रज भारतात आले तेव्हा भारताचा नकाशा वेगळा होता, आज वेगळा आहे आणि भविष्यात कधीही बदलू शकतो. आपल्या बाहूंत बळ असेल तर नकाशा बदलायला वेळ लागणार नाही,‘‘ अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चीन आणि पाकिस्तानकडून सीमेवर होत असलेल्या घुसखोरीला दम दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप सोहळा गुरुवारी रेशीमबाग मैदानावर झाला, या वेळी डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला कर्नाटक येथील धर्मस्थळाचे अधिकारी पद्मविभूषण डॉ. डी. वीरेंद्र हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी गोविंदसिंह टॉंक आणि महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते. सरसंघचालक म्हणाले, ‘नकाशाच्या रेषांवर भारत दाखवता येणार नाही. हिंदू संस्कृती, हिंदू समाज म्हणजे भारत आहे. बंधुभाव हा धर्म आणि मानवता ही संस्कृती मानली जाते आपल्या देशात. संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन संघाचा आग्रह आहे. भारतात गेल्या काही दिवसांमध्ये झालेला बदल संपूर्ण जगाला आकर्षित करीत आहेत; पण आर्थिक नव्हे तर चारित्र्याची शक्ती भारतात कायमस्वरूपी आहे.‘‘
डॉ. हेगडे यांनीही या वेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री राजवर्धन राठोड, बंगळूरच्या इस्रो उपग्रह केंद्राचे संचालक डॉ. एम. अण्णादुराई आणि समूह संचालक डॉ. एस. व्ही. शर्मा यांची विशेष उपस्थिती होती.

विश्वयोग दिवसाचा उल्लेख करताना डॉ. भागवत म्हणाले, ‘प्रथमच भारताचा प्रस्ताव बहुमताने मान्य झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी प्रयत्न केले नसते तर ते शक्य झाले नसते,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले. देशात राष्ट्रीय भाव जागविण्यात संघाचे मोठे योगदान आहे, असे मत प्रमुख पाहुणे वीरेंद्र हेगडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासह अनेकांनी विशेष उपस्थिती लावली.