राज्यातील सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

0
15

भंडारा दि.१०: : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु राज्याचे अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचे जाहीर केले आहे. कर्जमाफी नाकारून भाजपा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी केला. भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, काँग्रेसच्या काळात संपुआ सरकारने ७२ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली होती. परंतु भाजपा सरकारने कर्जमाफी देण्यासाठी नकार दिला आहे.काँग्रेस सरकारच्या काळातील २०१३ चा भूमी अधिग्रहण कायदा व मोदी सरकारचा भूमी अधिग्रहण अध्यादेश याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास मोदी सरकारचा भूमी अधिग्रहण कायदा हा केवळ उद्योगपतींच्या हितासाठीच असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही केला.

काँग्रेसचे सरकार असताना लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान विकत घेऊन ऐतिहासिक वास्तु म्हणून जतन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सत्तांतर झाल्यावर भाजपचे नेते श्रेय लाटण्यासाठी घोषणा करीत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा महासचिव प्रेमसागर गणवीर, प्रमोद तितीरमारे, शहर अध्यक्ष सचिन घनमारे उपस्थित होते.