लाच घेताना भूमापक जाळ्यात

0
23

लाखनी दि.१०: स्थानिक भूमीअभिलेख कार्यालयातील परिरक्षक भुमापक राधेश्याम श्रीराम क्षीरसागर (३२) याला तीन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालयात मंगळवारला करण्यात आली.तक्रारकर्त्यांच्या वडिलाने सन १९७९ मध्ये खरेदी केलेले प्लॉट शीट क्रमांक १० मधील नगर भुमापन क्रमांक ४८, क्षेत्रफळ २०६६ चौरस मीटरपैकी ९.४५ मीटर व १५.२४ मीटरचा प्लॉट खरेदी करून नोंदणी केली.
तक्रारकर्त्याचे वडिल सन २०१० मध्ये निधन झाले असून तक्रारकर्त्यांचे वडिलांनी फेरफार न केल्यामुळे ३ जानेवारी रोजी लाखनी येथील भूमीअभिलेख कार्यालयात अधिकार अभिलेखात नाव दाखल करण्याबाबत संबंधित कागदपत्रासह अर्ज केला होता. या कार्यालयात संबंधित भुमापक क्षिरसागर यांना प्लॉटचे फेरफार करून देण्यासंबंधी विनंती केली असता वरिष्ठांशी चर्चा करुन फेरफार करून देतो, अशी टाळाटाळ करीत फेरफार करून दिले नाही.
त्यानंतर तक्रारकर्त्यांनी ५ जून रोजी क्षीरसागर यांना भेटून फेरफार करण्याची विनंती केली असता तीन हजार रूपयांची मागणी करुन दि. ९ जून रोजी पैसे घेऊन येण्यासाठी सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
त्यानुसार आज मंगळवारला भूमीअभिलेख कार्यालयात रचलेल्या सापळ्यात क्षीरसागर हे तीन हजार रूपये घेताना पकडण्यात आले. आरोपीने पदाचा दुरूपयोग करून भ्रष्ट मार्गाने लाच घेतल्याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यशवंत मतकर, पोलीस उपअधिक्षक संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, जीवन भातकुले, पोलीस हवालदार बाजीराव चिंधालोरे, अशोक लुलेश्वर, गौतम राऊत, मनोज पंचबुद्धे, भाऊराव वाडीभस्मे, सचिन हलमारे, शेखर देशकर, अश्विन गोस्वामी, पराग राऊत यांनी केली.