मजुरांचे पगार देण्यास वनपालाची टाळाटाळ

0
19

चंद्रपूर दि.१०: मध्य चांदा वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग बल्लारशाहअंतर्गत कन्हारगाव वनक्षेत्रातील बांबू वाहतूक करणाऱ्या मजुरांची मजुरी देण्यास संबंधित वनपाल चार महिन्यांपासून टाळाटाळ करीत आहे. मजुरांना त्वरित मजुरी न मिळाल्यास वनपालाच्या निवासासमोर कुटुंबासह उपोषण करुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कन्हारगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. २१ व ६७ मध्ये बांबू तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यात निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त बांबू कटाई करण्यात आली. बांबू जंगल ते जंगल डेपोपर्यंत ढुलाई करण्यासाठी मजुरांना प्रती बांबू तीन रुपयांप्रमाणे रक्कम देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यात मजुरांची ८२ हजार २७० बांबू जंगल ते जंगल डेपोपर्यंत माहे फेब्रुवारी, मार्च व एप्रिल असे तीन महिने ढुलाई करण्यात आली. त्याची मजुरी अंदाजे दोन लक्ष ५० हजार होत असून मजुरीसाठी वनपाल संतोष चोले यांच्याकडे मजुर जावू लागले.

मात्र वनपालांनी मजुरी देण्यासाठी टाळाटाळ सुरू केले. त्याच्या निवासात अनेकदा चकरा मारल्या. मात्र आज देतो, उद्या देतो पैसे मिळाल्यानंतर देतो म्हणून मजुरांना त्रस्त करून सोडले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही मजुरांना मजुरी मिळाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, वनपाल संतोष चोले यांनी जंगल ते जंगल डेपोपर्यंत बांबू वाहतूक करणाऱ्या खऱ्या मजुरांऐवजी बनावट मजुरांच्या नावाने प्रमाणके बनवून पगार हडप केला. या वनपालाने क्षेत्रीय कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करुन माया गोळा केली. त्यातून त्यांनी नांदेड येथे फ्लॅट घेतल्याची चर्चा आहे. सध्या कन्हारगावातून वडील आजारी असल्याचा बहाणा करून तो सुट्या टाकून पसार झाला आहे. मजुरांना पगार देण्यासाठी टाळाटाळ करीत असलेले चोले, विविध कृप्त्या करून वरिष्ठांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे.