अर्जुनी मोरगाव,दि.24ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकडाऊनची घोषणा केली.देशातील सर्व वाहतुकीच्या सुविधा ठप्प झाल्या.याचा सर्वात मोठा फटका परराज्यात रोजगारासाठी गेलेल्या मजूरांना बसला. मजूर पायीच गावाकडे निघाले.तहान भुकेची चिंता न करता जीवासाठी पायपीट करणाऱ्या या मजूरांसाठी अर्जुनी मोरगावचे काही समाज सेवेची आवड असणारे युवक समोर आले.मजुरांच्या अन्नाची सोय करून ते या स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत झाले आहेत.
रोजगार गेला,खाण्याचे वांदे, उपासमारीची पाळी आली. या परिस्थितीत मजुरांनी गावाकडे धाव घेतली.वाहतूक व्यवस्था नाही म्हणून शेकडो किलोमीटरचे अंतर पायीच गाठण्याची मानसिक तयारी करुन आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातून मजुरांचे पायी चालणारे जत्थे रोज मध्यप्रदेश,छत्तीसगड राज्यासाठी येत आहेत.डोक्यावर सामानाचे ओझे,कमरेव लहान मुले आणि भूक व तहानेने व्याकुळ मजूर बघून मन हेलावून जातो.
या स्थलांतरन करणाऱ्या मजुरांना अन्न व आराम करण्यासाठी निवारा देण्याचे निस्वार्थ काम येथील समाज सेवी युवकांनी हाती घेतले आहे.”कुठेही असे मजूर दिसले की आम्हाला फोन करा”असे आवाहन सोशियल मीडियावर केले आहे.येथील उमेश दुबे,धिरेंन जीवानी,रामू जीवानी,शाम चांडक,अश्विनसिंह गौतम,संजय पवार,छत्रपाल कापगते, डॉ. भूपेश मड़ावी यांच्या सोबतीला नगराध्यक्ष किशोर शाहरे,नगरसेवक प्रकाश उईके दिवस रात्र, उन्हा तान्हात अश्या मजुरांचे शोधात हा गृप भटकंती करतो.मजुरांना एका ठिकाणी जमा करून,सोशल डिस्टस्टिंग पाळत त्यांना पोटभर अन्न देतात.एवढंच नाही तर पुढच्या प्रवासासाठी पार्सल देतात.शक्य झाल्यास पुढच्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देतात.शंभर लोकांच्या जेवणाची सोय रोजच सुरू आहे.आजतागायत हजाराच्या वर मजुरांची भूक शमविली आहे. मजुरांसाठी स्वतः रात्री उशिरा पर्यंत कुठलीच अपेक्षा न ठेवता स्थलांतरित मजुरांसाठी हे युवक देवदूताचे काम करीत आहेत.





