गडचिरोली,दि.28 : देशासह राज्यात सर्वत्र कोरोना संचार बंदीमुळे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शेती व शेती पूरक व्यवसामुळेच चालना मिळू शकेल असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत केले. संचार बंदीमुळे मोडकळीस आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोलीतील नागरीकांना आपल्या शेती व बिगर शेती व्यवसायांना चालना देण्यासाठी काय काय करता येईल यावर चर्चा यावेळी करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कृषी सभापती रमेश बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील उपस्थित होते.
खरीप हंगामाअगोदर जिल्हयातील जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांचेबरोबर सन २०२०-२१ मधील विविध उपाय योजनांबाबत चर्चा केली. जिल्हयातील पाऊस जास्तही आहे आणि समान कालावधीत पडतो. त्यामुळे खरीप हंगाम चांगल्या प्रकारे होतो. याचा फायदा घेवून शेतक-यांना विविध आर्थिक व शास्त्रीय पाठबळ देवून चांगल्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. जिल्हयातील धान लागवड क्षेत्र 2.05 हजार हेक्टर वरून आता पुढिल हंगामात 2.22 पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. जर रब्बी धान बियाणाचा प्रकार १०५ दिवसांचा घेतला आणि तशाप्रकारचे चांगल्या धानाचे वाण उपलब्ध करून दिले तर निश्चितच त्यांना चांगले उत्पादन घेता येईल. शेतीबाबत असणा-या विविध योजनांच्या लाभार्थी निवडीत पारदर्शकता आणून कृषी अधीक्षक, कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांनी समन्वय साधून काम करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पीक कर्जाबाबत येणा-या अडचणी लक्षात घेवून शेतक-यांना आवश्यक मदत अगोदर पासूनच करावी. जेणेकरून योग्य वेळेवर त्यांना कर्ज घेवून हंगाम चांगल्या प्रकारे घेता येईल असे ते म्हणाले.
बंद पडलेले इरिगेशन प्रकल्प, अपूर्ण व कामे सुरू न झालेल्या सिंचन विहरी याबाबत पाठपुरावा करून तातडीने कामे पुर्ण करावीत असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. महावितरण कडून 4 हजार पाचशेपेक्षा जास्त कृषी पंपांना जोडणी देण्याचे उर्वरीत काम मार्च 2021 पर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. गडचिरोली जिल्हयात बोगस बियाणे येणार नाही तसेच शेतीसाठी आवश्यक खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविली.
तेंदूपत्ता हंगामाबाबत येणा-या अडचणींवर यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्हयातील ग्रामीण भागातील तेंदू पत्ता संकलन हा मुख्य अर्थिक स्त्रोत आहे. यासाठी संचार बंदीमधून या व्यवसायाला सूट देण्यात आली आहे. संकलन करणारे मजूर, ठेकेदार व प्रशासनातील कर्मचारी यांनी आवश्यक कोरोनाबाबत काळजी घेवून ही प्रक्रिया राबवावी. प्रशासन यासाठी आवश्यक वाहतूक व संकलनास विहीत पध्दतीने मंजूरी देत आहे असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याबाबत वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना त्यांनी सूचना दिल्या.
चोर बीटी कापूस या जिलहयात येता कामा नये : जिल्हयात 15 हजार हेक्टर कापूस घेतला जातो. चोरबीटी कापूस या जिल्हयात येवू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक काळजी घ्यावी. यामुळे शेतक-यांचे नुकसान होते. याबाबत पालकमंत्री यांनी आपण उच्चस्तरावर परराज्यातून येणा-या चोर बीटी बाबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. यासाठी शेजारील राज्यातील कृषी मंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोना कोविड-१९ तपासणीबाबत जिल्हयात तपासणी लॅब बाबत प्रस्ताव राज्याला सादर करण्याच्या सूचना : गडचिरोली जिल्हयात मोठया संख्येने बाहेरील मजूर आले आहेत. तसेच शेजारील तेलंगणा व छत्तीसगड राज्यातून कित्येक मजूर छुप्या मार्गाने राज्यात प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमिवर जिल्हयात कोरोना नमुने तपासणी लॅब असणे आवश्यक असल्याचे बैठकीत चर्चेत समोर आले. याबाबत पालकमंत्र्यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकीत्सक यांना दिले. याबाबत राज्यस्तरावर पाठपुरावा करून त्यास मंजुरी घेण्यात येईल असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. यासाठी आवश्यक निधी आपत्ती व्यवसथापन मधुन उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
रेशन कार्ड नसलेल्या नागरीकांची माहिती तातडीने घ्या : जिल्हयातील संचार बंदीमुळे अडचणीत आलेल्या, रेशन कार्ड नसलेल्या व गरीब असलेल्या नागरीकांची माहिती घेण्याचे कार्य तातडीने पुर्ण करा अशा सूचना पालकमंत्र्यांनी पुरवठा विभागाला दिल्या. यातून गोर गरीब गरजू लोकांना मदत तातडीने पोहचविता येईल. याबाबत तहसिलदार यांना आवश्यक सूचना देवून माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे गरजू लोकांना आवश्यक मदत पोहचविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यातून त्यांना धान्य व इतर आवश्यक साहित्य पोहचविण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येणार आहे.
बोअरवेलच्या गाडयांना वाहतूकीस परवानगी : उन्हाळयाच्या पार्श्वभूमिवर जिल्हयात गरजू लोकांना पाण्याची उपलब्धता वेळेत होण्यासाठी बोअरवेलच्या गाडयांना तातडीने परवानगी देण्यासाठी पालकमंत्रयांनी प्रशासनाला निर्देश दिले.
कापूस खरेदी करण्यासाठी ५ दिवस करणार : मंत्री महोदयांनी दिले निर्देश
चामोर्शी येथील कापूस खरेदी केंद्रावर आठवडयातील दोनच दिवस कापूस खरेदी सुरू आहे. यासाठी आठवडयातील 5 दिवस खरेदी सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक कापूस तपासणी ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना वरीष्ठ पातळीवर पालकमंत्र्यांनी केल्या.





