30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ प्रधानमंत्री जनधन योजना मे महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात 500 रुपये होणार जमा

प्रधानमंत्री जनधन योजना मे महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात 500 रुपये होणार जमा

पैसे काढण्यासाठी बँक मित्र किंवा एटीएमचा वापर करा

0
231

गोंदिया दि.3(जिमाका): केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेच्या सर्व लाभार्थी महिला खातेदाराच्या खात्यावर एप्रिल, मे आणि जून महिन्यात प्रति महिना 500 रुपये इतकी रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा करण्यात येत आहे. मागील एप्रिल महिन्यात संबंधित लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

मे 2020 या महिन्याची रक्कम 2 मे 2020 पासून सर्व संबंधित बँकांकडे केंद्र सरकारकडून वर्ग करण्यात येत आहे. बँक खात्याच्या शेवटच्या अंकानुसार तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार टप्प्याटप्प्याने हे पैसे महिला खातेदारांच्या खात्यात जमा होणार आहे. लाभार्थी महिलांनी पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी न करता बँक मित्र किंवा एटीएमचा वापर करावा असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक गोंदीया यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.त्यामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यात जनधन योजनेचे खाते असलेल्या महिलांच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येकी 500 रुपये जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

पहिला दिवस 4 मे 2020 हा असून ज्या खाते क्रमांकाचा शेवट 0 किंवा एकने होतो, दुसरा दिवस 5 मे 2020 – ज्या खाते क्रमांकाचा शेवट 2 किंवा 3 होतो, तिसरा दिवस 6 मे 2020 – ज्या खाते क्रमांकाचा शेवट 4 किंवा 5 ने होतो,चौथा दिवस 8 मे 2020 – ज्या खाते क्रमांकाचा शेवट 6 किंवा 7 ने होतो आणि पाचवा दिवस 11 मे 2020 हा असून ज्या खाते क्रमांक शेवट 8 किंवा 9 ने होतो त्या खात्यातील रक्कम त्या-त्या दिवशी काढता येणार आहे.

पैसे जमा झालेल्या दिवशी किंवा 11 मे 2020 नंतर केव्हाही खातेधारकांना हे पैसे काढता येतील. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खातेदारांनी एकाच दिवशी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी न करता बँक मित्र किंवा एटीएमचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.