माथनी टोलनाक्यावर आमदार काशीवारला मारहाण

0
14

भंडारा,,दि.१८: -राज्यात टोल नाक्याचे प्रकरण गाजत असताना शुक्रवारी सत्तारुढ आमदारांनाच टोल नाक्यावरील अरेरावीचा फटका बसला. नाक्यावरील तरुणांच्या हल्ल्यात साकोलीचे भाजपचे आमदार बाळा काशीवार यांचा डावा हात फ्रॅक्चर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने टोलवरून सरकारला घेरण्यासाठी विरोधीपक्षाला यानिमित्ताने आणखी एक मुद्दा मिळाला आहे.

आमदार बाळा काशीवार हे नागपूरहून भंडाऱ्याकडे जाताना शुक्रवारी सायंकाळी माथनी नदीजवळील नाक्यावर हा प्रकार घडला. टोल नाक्यावर आमदार काशीवार यांची कार थांबवण्यात आल्यानंतर चालकाने आमदार असल्याचे तेथील कर्मचाऱ्याला सांगितले. तसेच, ओळखपत्रही दाखवले. चालकाने कार पुढे नेताच कर्मचाऱ्यांनी बॅ​रिकेट्स लावून त्यांची कार रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर आमदार खाली उतरताच नाक्यावरील अन्य कर्मचारी त्यांच्यावर धावून गेले.आमदाराला तेथील गायधने नामक कर्मचारीने तुम्ही आमदार असल्याचे आधी आमच्या मॅनेजरला ओळख करुन द्या या शब्दात सुनावताच आमदार काशीवार सुध्दा भडकले.आणि बाचाबाचीला सुरवात झाली. दरम्यान, दुसऱ्या कारमधून त्यांचा सुरक्षा रक्षक आणि सोबत असलेले त्यांचे मित्र अॅड.कातोरे व इतर त्यांच्या मदतीसाठी धावून आल्याने आमदारांवरील हल्ला टळला. या झटापटीत त्यांचा डावा हात पंजाजवळ फ्रॅक्चर झाला. आमदारांचे सुरक्षा रक्षक आले नसते, तर ​परिस्थिती आणखी चिघळली असती. या घटनेनंतर नाक्यावर तणावाची स्थिती उद्भवली. आमदारांना लगेच भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करवून घेतली. आमदारांनी नाक्यावरील कर्मचारी गायधने व इतरांविरुद्ध मौदा पोलिस ठाण्यात तक्रार केली. यापूर्वीही आमदारांचे चालक शिवा बोकडे यांना रविवारी नाक्यावर मारहाण करण्यात आली होती. दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडे टोल वसुलीचे कंत्राट आहे.विशेष म्हणजे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांच्यासोबतही या नाक्यावर येथील कमर्चारी यांनी अरेरावीची भाषा वापरली होती.पत्रकार,अधिकारी असो की लोकप्रतिनिधी यांच्या माथनी,सेंदुरवाफा येथील टोलनाक्याचे कर्मचारी असभ्य वर्तणुक करीत असल्याचे नवीन प्रकरण राहिले नाही. टोल नाक्यावरील हा प्रकार सभागृहात उपस्थित करणार असल्याचे आमदार ​बाळा काशीवार यांनी सांगितले.