31.9 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 11

२ हजार ९८४ विशेष शिक्षकांच्या समायोजनास गती  

0
शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू गैरप्रकार टाळण्याचे आवाहन
वाशिम,दि.७ मे– सर्वोच्च न्यायालय येथे दाखल रिट याचिका क्र. १३२/२०१६ मधील  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने शासन निर्णय दि. ८/१०/२०२४ नुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गतच्या समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमातील २,५७२ विशेष शिक्षक, अपंग समावेशित शिक्षण (माध्यमिक स्तर) योजने अंतर्गतचे पात्र ३५८ विशेष शिक्षक आणि अपंग एकात्म शिक्षण (प्राथमिक स्तर) योजने अंतर्गत माध्यमिक युनिटवरील वर्ग झालेले ५४ विशेष शिक्षक अशा एकूण २,९८४ विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
विशेष शिक्षकांचे समायोजनाची कार्यवाही पारदर्शक पध्दतीने आणि विहित प्रशासकीय कार्यपध्दतीचा अवलंब करून शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे स्तरावर सुरू आहे.
समायोजनाच्या या प्रक्रीयेबाबत ज्या विशेष शिक्षकांना लाभ दिला जाणार आहे, अशा विशेष शिक्षकांना किंवा त्यांच्या संबधीतांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दिले जात असेल तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचेमार्फत करण्यात येत आहे. याबाबत कोणताही गैरप्रकार / गैरव्यवहार आपले निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे: ([email protected]), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ([email protected] / [email protected]) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी. असा कोणताही गैरप्रकार / गैरव्यवहार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी.
असे शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक)प्राथमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद वाशिमचा राज्यात चौथा क्रमांक  

0
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
वाशिम, दि.७ मे -राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष विकास अभियानात जिल्हा परिषद वाशिमने संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या १०० दिवस अभियानाचा उद्देश म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी अंमलबजावणी करून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहचवणे, ग्रामविकासाच्या प्रक्रियेला गती देणे आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हा होता. हे अभियान प्रशासनाच्या गतिमानतेचा आढावा घेणारे, उद्दिष्टांवर आधारित आणि वेळेवर परिणाम साधणारे असे ठरले.
जिल्हा परिषद वाशिमने या अभियानात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, जलसंधारण, ई-गव्हर्नन्स, रोजगार निर्मिती आणि ग्रामविकास यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावली. यामुळेच वाशिम जिल्ह्याला राज्यस्तरावर चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा एकत्रित करून, नियोजनबद्ध कार्यपद्धती, सततचा आढावा, स्थानिक पातळीवरील अंमलबजावणी आणि जनतेच्या सहभागावर भर देऊन या अभियानाला यशस्वी केले. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल राज्य सरकारने घेतली असून, मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या यशामागे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, स्वयंसेवी संस्था आणि जनतेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे यश संपूर्ण जिल्ह्याचे असून, भविष्यातील विकासासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
जिल्हा परिषद वाशिमच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. विकासाच्या दिशेने एक पुढचे पाऊल म्हणून या यशाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.

विद्यापीठात हेक्झावेअर कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह-चाळणी परीक्षेत १२ विद्यार्थ्यांची निवड

0
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हेक्झावेअर टेक्नॉलॉजी मिहान नागपूर येथील कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह पार पडला. महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात हा प्लेसमेंट ड्राईव्ह बुधवार, दि. ७ मे २०२५ रोजी घेण्यात आला. चाळणी परीक्षेत १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. भूषण महाजन, हेक्झावेअर कंपनीचे एचआर अधिकारी ऋतुजा पवार, तयबा खान, मृगांग अंबुलकर यांची यावेळी उपस्थिती होती. प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांनी प्लेसमेंट ड्राईव्ह करिता उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. भूषण महाजन यांनी मुलाखतीला आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. हेक्झावेअर टेक्नॉलॉजी कंपनीकडून एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये चाळणी परीक्षेत निवडण्यात आलेल्या १२ विद्यार्थ्यांमधून अंतिम निवड केली जाणार आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित पदाबाबत मुलाखती घेतल्या जात असल्याने या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये प्राणिशास्त्र तसेच वैद्यकीय शास्त्राशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घेतला.

प्रस्तावित परीक्षा भवनाची प्र-कुलगुरूंकडून पाहणी,-तातडीने दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना

0
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सद्यस्थितीत एलआयटी परिसरात असलेला परीक्षा विभाग महाराज बाग चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात स्थानांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. प्रस्तावित परीक्षा विभाग इमारतीची पाहणी माननीय प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांनी बुधवार, दि. ७ मे २०२५ रोजी केली. प्रस्तावित इमारतीत दुरुस्ती तसेच विजेची कामे तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी अभियांत्रिकी विभागाला दिल्या.
विद्यापीठाचा परीक्षा विभाग सद्यस्थितीत अमरावती रोडवरील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात आहे. या परीक्षा विभागाचे लवकरच स्थानांतरण महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात केले जाणार आहे. जुन्या इमारतीत परीक्षा भवन स्थानांतरण केले जाणार असल्याने येथील व्यवस्था तसेच दुरुस्ती कार्य गतीने होणे आवश्यक आहे. परीक्षा विभागाकरिता आवश्यक जागा तसेच विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीने विविध विभाग कोणत्या ठिकाणी स्थानांतरित केले जाणार आहे, याबाबत प्र-कुलगुरु डॉ. कोंडावार यांनी माहिती घेतली. यावेळी अभियांत्रिकी विभागातील महेंद्र पाटील यांनी प्र-कुलगुरु डॉ. कोंडावार यांना याबाबत माहिती दिली. या इमारतीतील दुरुस्ती तसेच विद्युत कामे तातडीने करण्याच्या सूचना यावेळी अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या.

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळमुक्त योजनेतील कामाला वेग

0
*जिल्हाधिकाऱ्यांचे लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 7 : शासनाची महत्वाकांक्षी गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ही योजना शेतजमिन सुपीक करणे आणि धरणातील पाणीसाठा वाढवणे, यासाठी उपयुक्त असल्याने शासनस्तरावर जाणीवपूर्वक राबविल्या जात आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
चांदुररेल्वे तालुक्यातील सोनगाव आणि शिवणी येथे सुरू असलेल्या कामांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार पुजा माटोडे, पाटबंधारे उपविभागीय अभियंता पी. जी. दातीर, प्रकल्प अभियंता वसंतराव पांडव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अमोल आमले, प्रवीण गावंडे, दिनेश आमले, प्रशांत शिरफाते, तलाठी श्री. नादणे, विजय येडे, गजानन राऊत, प्रमोद राऊत, हर्षल वानखडे, आषिश गावंडे, श्री. लव्हाळे, किशोर बैशवार, निलेश सौसाकडे, अक्षय जामदार, अक्षय भेंडे, अक्षय फत्तेपूरे आदी उपस्थित होते
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज चिरोडी, ता. चांदुर रेल्वे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चिरोडी पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. चांदुररेल्वे गटसाधना केंद्र येथील पिपल्स कला मंचच्या नाट्य अभिनय व्यक्तिमत्व विकास शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले. तसेच चांदुर रेल्वे तहसील कार्यालय येथे सर्व विभाग प्रमुखांची कामाचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेंतर्गत अंबापूर, ता. चांदुररेल्वे येथील जलयुक्त शिवारच्या कामास भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर निंभा, ता. चांदुररेल्वे येथील विठाई चॅरिटेबल ट्रस्टच्च्या आरओ प्लॉन्टचे उद्घाटन केले. तसेच नदी पुनर्जीवन अंतर्गत तयार केलेल्या पुलाचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले. शेंदूरजना खुर्द येथील सिमेंट नाला बांधकामाची पाहणी केली.
श्री. कटियार यांनी तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे सर्व विभाग प्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच धामणगाव रेल्वे येथे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाना शिधा पत्रिका वाटप, तसेच कोलाम समाजातील लोकांना गोल्डन कार्ड व जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर, ता. धामणगाव रेल्वे येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाची कामाची पाहणी केली. तसेच चिंचपूर ता. धामणगाव रेल्वे येथील जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरण कामाची पाहणी करण्यात आली.

सीए दिनेश दादरीवाल यांची आयसीएआयच्या केंद्रीय सीपीई समितीमध्ये निवड

0

गोंदिया,दि.०७ः-येथील वरिष्ठ चार्टर्ड अकाउंटंट दिनेश दादरीवाल यांची नवी दिल्ली येथील द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या सीपीई केंद्रीय समितीवर एकमताने निवड झाली आहे. ही समिती देशभरातील चार्टर्ड अकाउंटंट्सना अद्ययावत कायदेशीर आणि व्यवसाय माहिती पुरवते, सेमिनार आयोजित करते आणि नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करते.
गोंदियातील सीए समुदायासह भाजप कार्यकर्ते आणि समाजातील अनेक मान्यवरांनी दिनेशजींचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.दिनेशजींच्या निवासस्थानी भाजप युवा नेते विनोद चांदवानी (गुड्डू), सुनील संभावनी, सोनू केशवानी, शाम वाधवानी, सीए अमित भाग्यवानी, सीए दीपक गलानी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी, सीए दिनेशजी दादरीवाल म्हणाले की, सीपीई समितीच्या माध्यमातून ते व्यावसायिकांना जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी, सेमिनार आयोजित करण्यासाठी आणि व्यापारी वर्गाच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.गोंदियाला त्यांच्या सन्माननीय निवडीचा अभिमान आहे.

सचिन तालेवार महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू

0

मुंबईदि. 07 मे 2025: महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी बुधवारी (दि. 7) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. श्री. तालेवार गेल्या 28 वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.

नवनियुक्त संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार मूळचे नागपूर जिल्ह्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे झाले आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर श्री. तालेवार 1997 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूर येथे रूजू झाले. पदोन्नतीने सहायक अभियंता म्हणून कार्यरत असताना सन 2006 मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर त्यांनी वर्धा, नागपूर व जालना येथे काम केले आहे. दरम्यान महावितरणकडून त्यांची गूडगाव येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील (एमडीआय) एनर्जी मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंट (पीजीडीएम) अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. सन 2007-08 मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

 त्यानंतर सन 2016 मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीमध्ये श्री. सचिन तालेवार यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर लातूर येथे काम केले. तर सन 2018 मध्ये सरळसेवा भरतीद्वारे त्यांची मुख्य अभियंता म्हणून निवड झाली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी जून 2018 ते डिसेंबर 2022 पर्यंत काम केले. बदलीद्वारे छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना मे 2023 मध्ये श्री. तालेवार यांची इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून निवड झाली. या कंपनीत ते दोन वर्षांपासून कार्यरत होते. त्यानंतर महावितरणचे संचालक (प्रकल्प) म्हणून नुकत्याच झालेल्या थेट भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाली आहे.

‘महावितरणच्या ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेसह (आरडीएसएस) विविध योजनांमधून पायाभूत वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांसोबतच प्रामुख्याने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सर्व योजनांना आणखी गती देत कामे लवकर पूर्ण करण्यात येईल’, असे महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार यांनी सांगितले.

आंबेडकरी साहित्यिक विचारवंत धनराज डहाट यांचे निधन

0
नागपूर,दि.०७ः नागपूरातील आंबेडकर साहित्यिक, विचारवंत आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे सामाजिक कार्यकर्ता धनराज डहाट यांचे आज ७ मे रोजी पहाटे दुखद निधन झालेले आहे.त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर समतानगर अंबाझरी येथून दुपारी 4:00 वाजता निघेल व अंतिम संस्कार अंबाझरी घाटावर करण्यात येणार आहे.

दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवण्यावर मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांचा स्थगनादेश!

0
अकोला – जिल्हा परिषद अंतर्गत सत्र २०२४-२०२५ च्या दलित वस्तीचा निधी अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीने सप्टेंबर २०२४ मध्ये नियमाप्रमाणे व मंजूर नियत्वनुसार मंजूर केला होता. त्याअनुषंगाने सदर निधी वितरित करण्यासाठी नियमानुसार व परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला महाराष्ट्र शासन यांना दिला होता. परंतु दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अकोला जिल्हयाचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीचे दोन इतिवृत्त तयार करून मागासवर्गियांसाठी राखीव असलेला मंजूर दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवला याविरूध्द माजी समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे आणि काही सरपंच यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिका क्र.२४०३/२०२५ ची सुनावणी घेत असतांना दि.५ मे २०२५ रोजी सदर हस्तांतरित झालेल्या निधी वितरणाला स्थगनादेश दिला असून जिल्हाधिकारी अकोला यांना या संदर्भात याचिकेत नमूद सर्व मुद्यांवर शपथपत्र दाखल करण्यास निर्देश दिलेले आहेत.
एकाच बैठकीचे दोन वेगवेगळे इतिवृत्त तयार करणे, नियमानुसार प्रस्ताव असतांनादेखील त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला निधी इतर प्रयोजनाकरिता बेकायदेशीरपणे वळवणे अशा अनेक मुद्यांवर याचिका दाखल आहे. फंडस् ट्रान्सफर करतांना अतिशय अवाजवी घाई केली आहे, हे सुध्दा याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे.
मुळात ज्या उद्देशासाठी मागासवर्गियांसाठी सरकारकडून निधी आले आहे, ते दुसऱ्या संस्थानला वळवणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेत प्रतिवादी म्हणून पालकमंत्री अकोला, सचिव समाजकल्याण विभाग मंत्रालय मुंबई, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग अकोला, जिल्हाधिकारी अकोला, सचिव जिल्हा नियोजन समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला, कृषी विकास अधिकारी जि.प. अकोला यांना केलेले आहे.
याचिकाकर्त्यांच्यावतीने उच्च न्यायालय नागपूर येथे अॅड. आनंद राजन देशपांडे यांनी बाजू मांडली.
पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय सदस्य अरुंधती सिरसाठ, युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडी अध्यक्ष व माजी समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, माजी गट नेता ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, विकास सदांशिव, पराग गवई, अविनाश खंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.