20 मे साताराच्या राज्यव्यापी आंदोलनात शामिल होण्याचे आव्हान.
सडक अर्जुनी, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक) द्वारे जिल्ह्यातील ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा सडक अर्जुनी येथे झालेल्या अधिवेशनात यावलकर समितीच्या शिफारसी मान्य करुण वेतनश्रेणी, पेन्शन लागू करने, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची व वसुलीची अट रद्द करुण किमान वेतन व भत्त्यावर शंभर टक्के अनुदान राज्य शासनाने देने सह इतर महत्वाच्या मागण्यांना घेवून 20 मे ला ग्रामविकास मंत्री यांचे सातारा स्थित कार्यालयावर बेमुद्दत धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना शामिल होण्याचे आव्हान करण्यात आले अधिवेशनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेत मजुर युनियनचे महासचिव कॉ. शिवकुमार गणवीर यांनी केले व कार्यक्रमाची अध्यक्षता चत्रुगन लांजेवार यांनी केली प्रास्ताविक रवींद्र किटे यांनी केले महासंघांचे राज्य कार्याध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस मिलिंद गणवीर यांनी जिल्ह्यातील व राज्यातील होत असलेल्या कार्यक्रमाचा, संघटनेच्या वाटचालीची तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आंदोलनाची मांडणी केली या अधिवेशनात आयटकचे जिल्हा ध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव रामचंद्र पाटील, विवेक काकडे (विद्युत कर्मचारी फेडरेशन) शालूताई कुथे,वर्षा पंचभाई(आशा गटप्रवर्तक), करुणा गणवीर, ललिता राऊत (शापोआ युनियन), पौर्णिमा चुटे (आंगणवाडी कर्म. युनियन) आदी कामगार संघटनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन करत ग्रा. पं. कर्मचाऱ्याबरोबर आपली एकजूट दर्शवली अधिवेशनात मे 5 महिला प्रतिनिधी सह 27 सदस्यीय जिल्हा कार्यकारिणीची सर्व सम्मतीने निवड करण्यात आली यात चत्रूगण लांजेवार(अध्यक्ष)महेंद्र कटरे (कार्याध्यक्ष), मिलिंद गणवीर (महासचिव), महेंद्र भोयर (कोषाध्यक्ष), आशिष उरकूडे, अशोक परशुरामकर, ईश्वरदास भंडारी, भाऊलाल कटंगकार, (उपाध्यक्ष) रवींद्र किटे(सचिव), विष्णू हत्तीमारे(संघटन सचिव), विनोद शहारे, बुधराम बोपचे(सहसचिव) यांचा समावेश आहे कार्यक्रमाच्या अखेर विष्णू हत्तीमारे यांनी आभार मानले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा अधिवेशन संपन्न
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भोपाळ, दि. 11 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या करारामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला मोठा लाभ मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोपाळ येथे दिली.
सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक आज भोपाळ येथे झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, दोन्ही राज्यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तुलसीराम सिलावट, कुंवर विजय शाह आणि दोन्ही राज्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशसाठी ऐतिहासिक आहे. ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाचा आम्ही पूर्वीच संकल्प केला होता. आज त्यावर दोन्ही राज्यांनी सहमती केली आणि त्यासाठी सामंजस्य करार झाला. यापूर्वी ही बैठक 2000 मध्ये बैठक झाली होती, त्यानंतर 2025 मध्ये ही बैठक झाली. परंतू या प्रकल्पाबाबत दोन्ही राज्य परस्परांच्या संपर्कात होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी आंतरराज्य जलकरारांना गती देण्यास सांगितले आणि 2016 पासून आम्ही याला गती दिली. तापी मेगा रिचार्ज हे जगातील एक आश्चर्य आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 2,34,706 हेक्टरला सिंचनलाभ होईल, तर मध्यप्रदेशला 1,23,082 हेक्टर सिंचनलाभ मिळेल. महाराष्ट्रात जिथे खारपाणपट्टा आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या समस्या आहेत, तेथे मोठा लाभ या प्रकल्पामुळे होणार आहे. यात जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या पट्ट्यात मोठा दिलासा मिळेल. शेतकर्यांच्या जीवनात मोठी क्रांती होईल आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल. केंद्रीय योजना म्हणून याचा स्वीकार व्हावा, अशी विनंती आता आम्ही दोन्ही मुख्यमंत्री मिळून केंद्र सरकारकडे पुन्हा करणार आहोत.
या बैठकीत महाराष्ट्राचे मुद्दे सुद्धा आम्ही मांडले. त्यात डांगुर्ली बॅरेज, जामघाट असे महत्त्वाचे मुद्दे होते. या जामघाट प्रकल्पासाठी 28 वर्षांपूर्वी मी मध्यप्रदेशात तत्कालिन मुख्यमंत्र्यांसोबत आलो होतो. पण, आता त्यालाही गती मिळते आहे, याचा आनंद आहे. या जामघाटमुळे नागपूर शहरासाठी पुढच्या 30-40 वर्षांसाठी पाणी मिळणार आहे. आता ऑक्टोबरमध्ये पुढची बैठक घेण्यात येईल. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश कोणत्या क्षेत्रात एकत्रित काम करु शकते, यादृष्टीने सुद्धा अनेक बाबींवर यावेळी चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
असा आहे तापी मेगा रिचार्ज प्रकल्प
– तापी नदीवर मध्यप्रदेशातील खरिया गुटी घाट येथे धरण
– एकूण सिंचनाला लाभ : 3,57,788 हेक्टर
– महाराष्ट्राला लाभ : 2,34,706 हेक्टर (जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती) (म्हणजेच सुमारे 5.78 लाख एकर)
– मध्यप्रदेशला लाभ : 1,23,082 हेक्टर (बुर्हाणपूर, खंडवा)
– एकूण पाणीवापर : 31.13 टीएमसी
– महाराष्ट्र : 19.37 टीएमसी/मध्यप्रदेश : 11.76 टीएमसी
– योजनेची किंमत : 19,244 कोटी (2022-23 ची किंमत)
वाशिम येथे “आपदा मित्र” प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात
खासदार पटेलांनी जाणून घेतल्या सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी व समस्या
गोंदिया,दि.११ : खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया स्थित निवासस्थानी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधत अडीअडचणी व समस्या एैकून घेतल्या.तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पक्ष संघटन यावर संवाद साधला. कार्यकर्त्यांकडून आलेले निवेदन स्वीकारून त्याच्या अडी – अडचणी व प्रलंबित समस्या जाणून घेत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन व पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया व तिरोडा तालुक्यातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून काँग्रेसचे बाजार समितीचे संचालक अरुण नागोजी गजभिये,रुपेश विजयकुमार नशिने,सचिन अवस्थी,सब्बू अग्रवाल,अभय अग्रवाल,प्रकाश जगतराम,रजनीताई कुंभारे सरपंच सीतेपार,दिलदार रंगारी सामाजिक कार्यकर्ते यांचा पक्षात प्रवेश करण्यात आला.गोंदिया तालुका ग्राम बनाथर येथील धनंजय गुप्ता,अशोक बरवे,दिनेश दवणे,हनस बरवे,कुमार बिसेन यांची पक्षात घर वापसी करण्यात आली.
नारीशक्तीच्या नेतृत्वाखाली तिरोड्यात वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीचे भव्य आयोजन
*तिरोडा*–क्षत्रिय राजपूत महिला मंडळ, तिरोडा यांच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती यावर्षीही पारंपरिक थाटात आणि सामाजिक एकतेच्या भावनेने साजरी करण्यात आली. ९ मे रोजी ठाकूर मोहल्ला, जुनी बस्ती येथे आयोजित या कार्यक्रमात शहरातील राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. महिलांच्या संघटित प्रयत्नांमुळे हा सोहळा एक आदर्श सामाजिक उपक्रम ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात एक भव्य शोभायात्रा काढून झाली. महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे दर्शन घडविणाऱ्या झांक्या, बँड-बाजे, डीजे आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे वातावरण उत्सवमय झाले. देशभक्तीपर गाण्यांवर युवक-युवतींनी नृत्य करत सहभाग घेतला. संपूर्ण तिरोडा शहर देशभक्तीच्या रंगात न्हाल्यासारखे भासले.या कार्यक्रमाचे संपूर्ण नेतृत्व क्षत्रिय राजपूत महिला मंडळाने केले. त्यांच्या संघटन क्षमतेमुळे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून एक अनुकरणीय उपक्रम साकारला गेला. महिलांच्या सहभागामुळे सामाजिक ऐक्याला बळकटी मिळाली आणि परंपरांचे महत्त्व अधोरेखित झाले.कार्यक्रमात उपस्थित श्री. उदय कुमार जी प्रमर, विजयसिंह बैस, नर्सिंग गहेरवार, अजयसिंह गौर (माजी नगराध्यक्ष), आणि इतरांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी युवकांना त्यांच्या आदर्शांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात महिलांनी व लहानग्यांनी पारंपरिक नृत्य, गीत व लघुनाटिका सादर केल्या. यामध्ये राजपूत संस्कृतीचा अभिमान व्यक्त झाला. नंतर आयोजित सामूहिक स्वरुचि भोजनात समाजबांधवांनी आनंदाने सहभाग घेतला. भोजन व्यवस्थापनाची जबाबदारी महिलांनी कौशल्याने पार पाडली.
महाराणा प्रताप यांचे जीवन हे राष्ट्रभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यांच्या जयंतीचा उत्सव म्हणजे केवळ परंपरेचा सन्मान नाही, तर त्यांच्या मूल्यांचा अंगीकार करण्याची संधी आहे. आजच्या तरुणांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजासाठी योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या भव्य आयोजनामुळे तिरोडा येथील क्षत्रिय समाजात नवचैतन्य निर्माण झाले. नारीशक्तीच्या नेतृत्वात पार पडलेला हा सोहळा सामाजिक एकता, परंपरेची जपणूक आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा ठरला. राजपूत महिला मंडळाच्या परिश्रमांनी हे आयोजन तिरोडाच्या सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणारे पर्व ठरले.कार्यक्रमाचे संचालन श्री. रितेश गहेरवार यांनी प्रभावीपणे केले, तर सायली राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिला मंडळाच्या सर्व सदस्यांचे त्यांनी विशेषतः अभिनंदन केले.
समृद्धी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्याशी भेट
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा
—————–
चित्रा कापसे/तिरोडा —नागपूर-गोंदिया समृद्धी एक्सप्रेसवे प्रकल्पामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि अन्यायकारक भूमिगत प्रक्रिया याविरोधात आवाज उठवण्यासाठी समृद्धी एक्सप्रेसवे शेतकरी संघर्ष समिती, तिरोडा यांचे शिष्टमंडळ आज नागपूर येथे केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री आणि नागपूरचे लोकसभा खासदार नितीन गडकरी यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात डॉ. दिनदयाल पटले, सतीश पटले आणि संदीप अनकर यांचा समावेश होता. त्यांनी गडकरी साहेबांना एक निवेदन सादर केले, ज्यामध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांवर चर्चा करण्यात आली ज्यामध्ये कमी प्रमाणात जमीन अधिग्रहण मोबदला ,वैयक्तिक नोटीसा न देणे, बेकायदेशीर चावडी नोटीसा, पांदन रस्त्यांची व पाण्याच्या प्रवाहाची व्यवस्था न करणे, पुनर्वसनाची प्रलंबित प्रक्रीया यांचा समावेश होता.
गडकरी साहेबांनी निवेदन गांभीर्याने ऐकून घेतले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्यात येईल, आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
चंद्रपूरात वैनगंगा नदीत ३ भावी डॉक्टर बुडाले;मित्रांसोबत सुट्टी घालवणे पडले महागात;शोध सुरू
चंद्रपूर;-चंद्रपूर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. आपल्या मित्रांसोबत वैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी आलेले एमबीबीएसचे तीन विद्यार्थी पाण्यात बुडाले आहेत.यात गोपाळ गणेश साखरे(रा.चिखली,जि.बुलढाणा),पार्थ बाळासाहेब जाधव(शिर्डी,जि.अहिल्यानगर) व स्वप्नील उध्दवसिंग शिरे(जि.छत्रपतीसंंभाजीनगर)यांचा समावेश आहे. या घटनेबद्दल कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला. हे विद्यार्थी गडचिरोली येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होते. पोहण्यासाठी आलेल्या या तिघांवर काळाने घाला घातला असल्याचे बोल उमटत आहेत.
मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील व्याहाड खुर्द येथील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गडचिरोली येथील ८ एमबीबीएसचे विद्यार्थी गेले होते,त्यापैकी ३ विद्यार्थीना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांसह नागरिकही घटनास्थळी दाखल झाले. सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचलेले असून पाण्यात बुडालेल्या तिघांचा शोध हा घेतला जातोय. आज शनिवारची सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीत पोहण्यासाठी आले होते.
मात्र, यादरम्यान तिघेजण पाण्यात अचानक बुडाले. दरम्यान पाच जणांना पाण्यातून बाहेर पडण्यास यश मिळाले. मात्र, तिघेजण बुडाले. अनेक प्रयत्न करूनही तिघेही शोधकार्यदरम्यान सापडले नाही. शेवटी रात्र झाल्याने ही शोधमोहिम प्रशासनाकडून थांबवण्यात आली.आज परत शोधमोहिम ही सुरू केली गेली आहे. या घटनेने तिघांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
निवृत्तीच्या ३ महिने आधीच पाकिस्तानशी लढताना वीरमरण;सुभेदार मेजर शहीद,दोन मुलं पोरकी
नवी दिल्ली:-भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या ३ दिवसांपासून दोन्ही देशांकडून हल्ले सुरु आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर आणि एअर स्ट्राइक केल्याने पाकिस्तान बिथरला आहे.दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये मिसाईल आणि ड्रोनसहित ‘एलओसी’वरून गोळीबार होत आहे. पाकिस्तानने केलेल्या या गोळीबारात राजौरी भागात तैनात असलेले सुभेदार मेजर पवन कुमार शहीद झाले. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळी राजौरीमध्ये गोळीबार केला. या गोळीबारानंतर सुभेदार मेजर आणि त्यांच्या टीमने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.
पाकिस्तानच्या गोळीबारात सुभेदार मेजर जखमी झाले. गोळीबारात जखमी झालेल्या सुभेदार मेजर पवन कुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पवन कुमार यांनी रुग्णालयात उपचारादम्यान जीव सोडला. सुभेदार मेजर पवन कुमार यांच्या मृत्यूची वार्ता त्यांना कुटुंबीयांना देण्यात आली आहे. डीसी कांगडा हेमराज बैरवा यांनी स्वत: सुभेदार मेजर यांच्या घरी जाऊन वार्ता कळवली. सुभेदार मेजर पवन कुमार यांचं पार्थिव यांच्या गावी आज पोहोचणार आहे.
वडील सैन्यात होते हवालदार
कांगडा जिल्ह्यातील शाहपूर नगर पंचायतच्या वार्ड नंबर ४ च्या नगरसेवक शुभम यांनी सांगितलं की, ‘४९ वर्षीय पवन कुमार यांच्या शहीद होण्याची वार्ता कळाली. पवन कुमार हे २५ पंजाब रेजिमेंट होते. ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्याआधी देशासाठी शहीद झाले. पवन कुमार यांच्या पश्चात कुटुंबात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. पवन यांचे वडील गरज सिंह सैन्य दलात हवालदार होते.
पवन कुमार यांच्या शहीद होण्याची वार्ता कळताच त्यांच्या घरी शोककळा पसरली. त्यांच्या शहीद होण्याची वार्ता कळताच त्यांच्या घरी लोकांची येजा सुरु झाली आहे.पवन कुमार यांच्या शहीद होण्याच्या बातमीने त्यांच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पवन कुमार यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं आहे. पवन कुमार यांच्या आईचं नाव किशो देवी आहे. तर २३ वर्षीय मुलाचं नाव अभिषेक आहे. तर मुलीचं नाव अनामिका आहे.
अवघ्या चार दिवसांत शहबाज शरीफ यांनी गुडघे टेकले
नवी दिल्ली:- पाकिस्तान काही केला सुधारणारा देश नाही हे पुन्हा एकदा त्यानं स्वता: सिद्ध करून दाखवलं आहे. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्ताननं युद्धबंदीचे उल्लंघन केले. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्री यांनी पत्रकर परिषद घेत लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. त्यामुळे शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग आला आहे आणि आता भारत मोठा निर्णय घेईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तान सैन्याने पंतप्रधानांच्या विरोधात बंड केलं असल्याचेही बोलले जात आहे. मात्र पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेला फोन करून भारतासोबत युद्धबंदीची मागणी केली. तथापि, युद्धबंदीच्या काही तासांनंतरच पाकिस्तानी सैन्याने पुन्हा त्याचे उल्लंघन केलं हे ही तितकेच खरं आहे. या मुद्द्यावर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानला या उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे, परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन केले. किंबहुना 4 दिवसांनी का होईना, युद्धबंदीची घोषणा करण्यापूर्वीच भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते.
गेल्या 4 दिवसांत भारतीय हवाई दलाने लाहोरमध्ये असलेली पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. याशिवाय, त्यांच्या तीन हवाई तळांवर हल्ला करून त्यांचे मनोबल खचले. त्यांची रडार यंत्रणा ही नष्ट झाली आहे. हे घडताना पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माफी मागण्यास सुरुवात केली आणि युद्धबंदीचे आवाहन केलंय. भारताने लक्ष्य केलेल्या चार पाकिस्तानी एअरबेसमध्ये मुरीद चकवाल एअरबेस, नूर खान एअरबेस (रावळपिंडी), रहीम यार खान एअरबेस आणि रफीकी एअरबेस (शोरकोट, पंजाब) यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्फळ केले, ज्यामुळे पाकिस्तान खूप घाबरला.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर एका पोस्टद्वारे केली होती. त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. किंबहुना, भारताने युद्धबंदीसाठी स्वतःच्या अटी देखील ठेवल्या, ज्या अमेरिकेने मान्य केल्या. दरम्यान, यापूर्वी भारताने स्पष्टपणे सांगितले होते की जर सीमेवर कोणताही हल्ला झाला तर तो युद्धाचा गुन्हा मानला जाईल. भारताचा हल्ला पाहून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेला फोन करून युद्धबंदीची मागणी केली, त्यानंतर मार्को रोबियो यांनी भारताला फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली आणि युद्धबंदीवर संमती मागितली.
अवकाळीचे सावट कायम;पुढचे ५ दिवस महत्वाचे;वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार
मुंबई:-गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. राज्यावर अवकाळीचे सावट कायम आहे. पुन्हा राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पाऊस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. याठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वादळी पावसाचे वातावरण कायम आहे. गेल्या ३ दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ३ दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील काही उन्हाळी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले आहे. पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील ४ दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे.