काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध; छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, संयोगीताराजे छत्रपतींनी सुनावले

0
24

नाशिक– काळाराम मंदिरामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध करण्यात आला. त्याकाळी शाहू महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणेक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला होता. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

संयोगीताराजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त करत एकूणच घटनेवर टीका केली आहे. काल रामनवमीच्या निमित्ताने संयोगीताराजे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी पुजा करताना महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले.

ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, अशाप्रकारे पोस्ट करत संयोगिताराजे यांनी महंतांना खडसावले आहे.

संयोगीता राजे यांची पोस्ट जशीच्या तशी

हे श्रीरामा,
स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे…
हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे..
आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी?या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.
त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.
नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच…तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.
या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही?
अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.

वेदोक्त प्रकरण काय?

शाहू महाराज राजघराण्यातील धार्मिक परंपरेने कार्तिक महिन्यात पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी महिनाभर नियमितपणे जात असत. महाराजांच्या अंघोळ सुरू केल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेला नारायण नावाचा भटजी ब्राह्मण पुरोहित काही मंत्र म्हणत असे. मात्र हा भटजी स्वतः आंघोळ न करताच मंत्र म्हणत होता. मंत्र म्हणताना पायातल्या चपला सुद्धा काढत नव्हता.

जो मंत्र म्हणत होता तो काही वेदोक्त नव्हता तर पुराणोक्त होता. शाहू महाराजांनी त्याला विचारले की, तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणत नाही? त्यावर तो म्हणाला शुद्रांसाठी पुराणोक्तच सांगावे लागते. शिवछत्रपतींच्या वंशजाला शुद्र म्हणून एक सामान्य भटजी संबोधत असल्याने महाराजांच्या मस्तकात आग पेटली. महाराजांनी त्या नारायण भटजीची तातडीने हाकालपट्टी करत राजवाड्यातील राजपुरोहितांना सुद्धा सर्व धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी करावीत असे सुनावले. यानंतर हे वेदोक्त प्रकरण प्रकरण फक्त करवीर संस्थानापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रभर पोहोचले.​​​​​​​​​​​​​​