युवकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन करिअर घडवावे – आमदार विनोद अग्रवाल

0
8

 युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर

        गोंदिया, दि.30:-  विद्यार्थ्यांनी खुप परिश्रम करून कौशल्य आत्मसात करावे तसेच आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडून त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे. उद्योजक होण्यासाठी शासनाच्या अनेकविध योजना असून युवकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.

         कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे जिल्हास्तरीय “राजश्री छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे” आयोजन २६ मे २०२३  रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सहायक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतूरे, सहायक आयुक्त कौशल्य विकास राजू माटे, समुपदेशक मिलिंद रंगारी, आशिष तायवाडे, प्राचार्य हेमंत आवारे व स्टेट बँक ऑफ इंडियाचे सत्येन्द्र कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

        प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आमदार विनोद अग्रवाल यांनी दीप प्रज्वलन केले व कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन केले. शिबिरामध्ये  विशेष अतिथी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील युवकांनी नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे उद्योजक बनावे याचे गोंदियातील एका तरुण यशस्वी उद्योजकाचे उदाहरण देऊन पटवून सांगितले. वर्कशॉपमध्ये केलेली सुंदर सजावट बघून याला वर्कशॉप म्हणावे की सभागृह असा प्रश्न त्यांनी केला. त्यांनी तंत्रज्ञानाविषयी असलेली आवड बोलून दाखवली. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली आवड असल्यास त्यात आपण यशस्वी होऊ शकतो असे सांगितले.

         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजू माटे हे होते. समुपदेशक मिलिंद रंगारी यांनी व्यक्तिमत्त्वानुसार आपले करिअर कसे निवडावे याबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यामुळे करिअर निवडतांना विद्यार्थी व पालक यांना होणारा संभ्रम दूर झाला. आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार आपआपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या विविध मान्यवरांचे त्यांनी उदाहरण देऊन पटवून सांगितले.

    आशिष तायवाडे यांनी दहावी व बारावीनंतरचे कुठले अभ्यासक्रम प्रवेशाकरीता उपलब्ध आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत शर्मा यांनी शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया येथील विविध अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया विषयी थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सत्येन्द्र कुमार यांनी शैक्षणिक कर्ज तसेच इतर योजनांबाबत मार्गदर्शन केले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना याविषयी अतिशय मोलाची माहिती दिली.

     कुणाल गोडचवार यांनी जिल्हा उद्योग केंद्राद्वारे उद्योजकांकरिता असलेल्या विविध योजनांबाबत विस्तृत माहिती दिली. प्रास्ताविक भाषणामध्ये संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित थ्री डी प्रिंटिंग हा नविन अभ्यासक्रम तसेच नळ कारागीर हा अभ्यासक्रम संस्थेमध्ये सुरू करण्यात येणार असल्याबाबत उपस्थितांना अवगत केले. गोंदिया तालुक्यामधील दहावी व बारावीनंतर प्रवेशाकरिता अभ्यासक्रमाच्या विविध संस्थांकडून करिअर प्रदर्शनी अंतर्गत स्टॉलवर त्यांच्या संस्थेत उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमाबाबतची माहिती प्रदर्शित करण्यात आली.

        याप्रसंगी विविध शासकीय विभागांचे योजनांचे प्रदर्शनीमध्ये स्टॉल लावण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विविध अभ्यासक्रमाची माहिती घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गटनिदेशक ए.व्ही.केने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील गटनिदेशक प्रेम कटरे व एस.एम.बारमासे तसेच सर्व शिल्पनिदेशक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार शिल्पनिदेशक जी.के.पटले यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.