गडचिरोली –गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या पोलीस जवानाचा मृतदेह शेवटी आज सापडला.बंडू वाचामी असे मृत पोलीस जवानाचे नाव आहे. बंडू वाचामी कोठी पोलीस मदत केंद्रात कार्यरत होता. भामरागड तालुक्यातील आरेवाडा जंगलात आज बंडू वाचामीचा मृतदेह सापडला. भामरागड तालुक्यातील कोठी हा अत्यंत अतिसंवेदनशील भाग असून या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला जवान बंडू वाचामी हा १० तारखेला संध्याकाळी शासकीय कामानिमित्त बाहेर पडला होता. तिथून हा पोलीस जवान गुंडूरवाही भागात गेला होता. कोठी परिसर अतिशय संवेदनशील असून या भागात माओवाद्यांच्या हालचाली नेहमी सुरु असतात. बेपत्ता प्रकरणातील सगळ्या शक्यता तपासून पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आली होती.नक्षलवाद्यांनी बंडू वाचामीचे अपहरण करून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.