अर्जुनी मोर./सुरेंद्रकुमार ठवरे- तालुक्याचे वैभव असलेला ईटियाडोह धरण आज ता.21/9/2023 ला पहाटे 6:00 वाजता ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातुन आवागमन करणा-या सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निसर्ग सौंदर्यांने नटलेला ईटियाडोह परिसर पावसाळ्याचे दिवसात अधिकच खुलून दिसते. संपूर्ण माती कामाने तयार करण्यात आलेला इटियाडोह धरण गाढवी नदीवर बनविण्यात आलेला आहे. सुट्ट्यांच्या दिवसात हजारो पर्यटक या धरणाला भेट देतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या धरणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे सन 2013 नंतर तब्बल सहा वर्षांनी सन 2019 ला आणि मागील वर्षी 15 ऑगस्ट 2022 ला इंटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाला होता. आणि आता 21 सप्टेंबर 2023 ला पहाटे सहा वाजता इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाला आहे .धरण ओव्हरफ्लो झाल्याने या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आज पासूनच तोबा गर्दी करतील यात शंका नाही. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश. छत्तीसगड राज्यातूनही पर्यटक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येतात. इटियाडोह धरणाचा सौंदर्य न्याहाळत पर्यटक नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, प्राचीन प्रतापगड किल्ला व हिंदू मुस्लिम एकात्मतेची ओळख असलेली महादेव पहाडी ,ख्वाजा उस्मान गणी हारुणी यांचा दर्गा ,जवळच असलेली तिबेटियन बांधवांची वसाहत व बौद्ध स्तूप ,बोंडगाव देवी येथील कुलस्वामिनी माता गंगा जमुना हे तालुक्यातील प्रमुख धार्मिक व पर्यटनाचे केंद्र असलेल्या ठिकाणीही पर्यटक भेट देतात .अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटियाडोह धरण पर्वताच्या मधोमध आहे. कुणीतरी जादूगराने जणू जादू करूनच धरण निर्माण केल्याचाही भास निर्माण होतो. धरणापासून भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचित करणारे धरण म्हणूनही प्रख्यात आहे. असे हे सौंदर्याची खान असलेले इटियाडोह धरण 21 सप्टेंबर 2023 ला पहाटे सहा वाजता ओव्हरप्लो झाल्याने पर्यटकाचे पाय आजपासूनच या धरणाकडे वळणार आहेत या धरणाचा नजारा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये ,शेतीचे अवजारे नदीपात्रात ठेवू नये, जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये, जलाशयाच्या सांडव्यावरून ओव्हर फ्लो होणारा विसर्ग कमी जास्त असू शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे अशी सूचना केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम यांनी केली आहे.