जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्यावतीने शौर्य दिवस कार्यक्रम उत्साहात

0
16

गोंदिया,दि.30ः-28 सप्टेंबरच्या रात्री आपण गाढ झोपेत असतांना भारतीय सैन्यदलाने उरी सर्जिकल स्ट्राईक घडवून अतिरेक्यांचा खात्मा केला व पाकिस्तानला धडा शिकवला होता.तो  ” शौर्य दिवस ” (२९ सप्टेंबर) हा दिवस भारतवासियांसाठी अभिमानाचा दिवस आहे.भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत जावी तसेच माजी सैनिकांचा सन्मान व्हावा यासाठी राज्य शासनामार्फत २९ सप्टेंबर हा दिवस “शौर्य दिन” म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.याचे औचित्य साधून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी भूषविले.पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीर पिता, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था गोंदिया व तिरोडा चे पदाधिकारी-सदस्य, जिल्ह्यातील माजी सैनिक व परिवार, मनोहर म्युनिसिपल विद्यालयातील शिक्षक वृंद-विध्यार्थी उपस्थित होते.

सदर वेळी आयोजित “शौर्य दिन” निमित्त वीरपत्नी व स्वातंत्र्य दिवसाच्या उपलक्षात आयोजित पथसंचालनात भाग घेणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते करण्यात आले.मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे संचालक प्रभाकर पुस्तोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था पुणे, ही महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षित माजी सैनिकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य वेळी संरक्षण दलात अधिकारी पदांवर जाण्याचे शैक्षणिक मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने स्थापन केली आहे. याद्वारे ग्रामीण भागातील प्रतिभावान, गरजू व होतकरू मुलांना विशेष मार्गदर्शन केले जाते.त्यामध्ये UPSC-NDA, राष्ट्रिय मिलिटरी स्कूल, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, सैनिक स्कूल मध्ये निवड होण्याकरीता खूपच कमी दरात ऑनलाइन माध्यमाने ट्युशन क्लासेस उपलब्ध करून दिले जात आहे.

देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी, परकीय शक्तीपासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी, आपत्ती काळात देशबांधवांच्या मदतीसाठी सज्ज असणारे, कोणत्याही अडचणीत आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारे भारतीय सैनिक हे आपल्या सर्वांसाठी आदर आणि अभिमान आहेत.त्यांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. जेव्हा जेव्हा देशावर कठीण प्रसंग आला, तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या जीवावर खेळून देशाला बाहेर काढले आहे आणि म्हणूनच माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याकरिता प्रशासनाने समर्पित भावनेने समस्या सोडल्यास सैनिकांच्या ऋणातून उताई होण्याची संधी आपल्याला मिळेल असे  जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले.

सदर कार्यक्रम उत्कृष्टरीत्या पार पाडण्याकरिता जिल्हासैनिक कार्यालयाचे श्री. बावणथडे व श्री. बिसेन यांनी नियोजन केले. तसेच शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना व माजी सैनिक बहुउद्देशिय संस्था गोंदिया व तिरोडा यांनी या कार्यक्रमास पुरेपूर सहकार्य केले.