तर विजापूर अपघात प्रकरणी कुडाळ येथे करण्यात आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
*कुडाळ:-कुडाळ आगारातून डूयटीवर गेलेल्या चालक आणि वाहक यांची दुर्घटना विजापूर स्टँड येथे घडली. या घटनेत कर्नाटक परिवहनच्या बसने कुडाळ डेपो मधील दोघांना जोरदार धडक दिली. यात दोघेही एसटी कर्मचारी गंभीर जखमी झालेत. मात्र, या घटनेला जवळवास तीन दिवस होवुनही या अपघाताची साधी तक्रार दाखल करण्यास कर्नाटक पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप कामगार संघटनेच्या वतीने अनुप नाईक यांनी एसटी प्रशासनावर करीत याबाबत शुक्रवारी दुपारी १ वाजता आगार व्यवस्थापक यांना घेराव घातला.यावेळी आगार व्यवस्थापक यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक न मिळाल्याने कामबंद आंदोलन छेडले.*
*️️कुडाळ येथून विजापूर या ठिकाणी ड्यूटीवर गेलेल्या दोन एसटी कर्मचाऱ्यांचा अपघात होवून त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार, १२ जून २०२४ रोजी घडली होती. सदर अपघात हा विजापूर डेपो नं. १ येथे रात्री १० च्या सुमारास घडला. या अपघातात कुडाळ आगाराचे चालक सतीश मांजरेकर (वय ४९ रा. पाट -गांधीनगर) आणि वाहक सचिन रावले (वय ३६, रा. निवती) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर मिरज येथील भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.*
*मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ६.३० वाजता कुडाळ ते विजापूर ही ड्युटी घेऊन चालक सतीश मांजरेकर आणि वाहक सचिन रावले हे गेले. त्यांनी संध्याकाळी ६ च्या सुमारास विजापूर येथे ड्युटी संपवून आपल्या ताब्यातील बस संध्याकाळी विजापूरहून कुडाळकडे येणाऱ्या चालक-वाहक यांच्या ताब्यात दिली. तर चालक सतीश मांजरेकर आणि वाहक सचिन रावले हे दुसऱ्या दिवशी सकाळी विजापूर ते कुडाळ अशी बसफेरी घेऊन येणार होते.*
*चालक सतीश मांजरेकर आणि वाहक सचिन रावले यांनी विजापूर येथे रात्रीचे जेवण केले. विजापूर डेपोतच रात्री १० च्या सुमारास फेरफटका मारताना विजापूर आगाराच्या कर्नाटक परिवहन बसने समोरून वेगात येऊन चालक सतीश मांजरेकर आणि वाहक सचिन रावले यांना धडक दिली. या धडकेत सतीश मांजरेकर आणि सचिन रावले हे दोघेही गंभीर जखमी झालेत. सतीश मांजरेकर यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून सचिन रावले यांच्या खांद्याकडील मुख्य हाड फ्रँक्चर तसेच कानाच्या ठिकाणी दुखापत झाली आहे. या दोघांवर प्राथमिक उपचार करून मिरज येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये धडक देणारी बस विजापूर (कर्नाटक) आगाराची असून रात्री मेकॅनिकल बसची ट्रायल (तपासणी) करीत होता. बसवर मेकॅनिकलचे नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.*
*️️या अपघातात कुडाळ एसटी आगारातील दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असताना याबाबत साधी तक्रार विजापूर येथे दाखल करण्यात आली नाही. याबाबत शुक्रवारी दुपारी १ वाजता आगार व्यवस्थापक यांना घेराव घातला. याविषयी आगार व्यवस्थापक यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक न मिळाल्याने कामबंद आंदोलन दुपारी २ वाजल्या पासून छेडणयात आले. कुडाळ डेपोचे सर्व एसटी कर्मचारी यांनी गेटवर आंदोलन छेडले. यावेळी आंदोलनस्थळी कुडाळ पोलीस दाखल झाले. कुडाळ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी एसटी वरिष्ठ अधिकारी तसेच कर्नाटक पोलीस यांच्याशी फोन वरून चर्चा केली. याबाबत पोलिसांत तक्रार आज रात्रीपर्यंत दाखल होईल. त्यानुसार, याची कॉपी देण्यात येईल, अशा आश्वासनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, या प्रकरणी तक्रार दाखल न झाल्यास शनिवारी पहाटे पासून कुडाळ आगारातून बस मार्गस्थ होणार नाहीत, असा इशारा एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी दिला आहे.*