30.7 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home गुन्हेवार्ता अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने तलाठ्याला दिली जोरदार धडक

अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने तलाठ्याला दिली जोरदार धडक

0
134

बुलढाणा : रेतीचे अवैध उत्खनन, वाहतुकीचा केंद्रबिंदू ठरलेल्या खडकपूर्णा धरण परिसरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून रेती माफियांचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. रेती माफियाचे मनोधैर्य कमालीचे वाढले आहे. काल मंगळवारी याचा भीषण प्रत्यय आला. रात्री दहा वाजताच्या सुमारास रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका तलाठ्याला सुसाट वेगाने अक्षरशः उडविले. या जोरदार धडकेमुळे तलाठी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्याला जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे ही घटना घडली. परमेश्वर दामोधर बुरकुल असे गंभीर जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. घटनेचा विस्तृत तपशील मिळाला नसून प्राथमिक माहितीनुसार, तलाठी परमेश्वर बुरकुल हे दुचाकीने देऊळगावराजाकडे जात होते. दरम्यान, मही गावाजवळ त्यांना अज्ञात टिप्पर चालकाने संभाव्य कारवाईच्या भीतीने सुसाट वेगात जोरदार धडक दिली. त्यामध्ये बुरकूल हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रारंभी तातडीने नाजिकच्या देऊळगाव मही येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांच्या जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याने आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले.

blank