32.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ शिवणीबांध जलाशयाच्या काठावर मासेमार मृतावस्थेत आढळला

शिवणीबांध जलाशयाच्या काठावर मासेमार मृतावस्थेत आढळला

0
137

 साकोली- तालुक्यातील शिवनीबांध जलाशयाच्या पाळीवर मासे पकडण्यासाठी गेलेला मासेमार मृतावस्थेत आढळून आला. सदर घटना दि.२७ मे रोजी रात्री ५ वाजता दरम्यान उघडकीस आली. सुरेश उपासराव वलथरे (५९) रा.शिवनीबांध असे मृतकाचे नाव आहे. मासेमाराचा मृत्यू अंगावर वीज कोसळल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

सानगडी जवळील शिवनीबांध येथील सुरेश वलथरे हा दि.२७ मे रोजी सायं.५ वाजता दरम्यान मासे पकडण्याकरीता शिवनीबांध जलाशयावर गेला होता. मात्र पाण्यात उतरण्याच्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला. घटना उघडकीस येताच याची माहिती साकोली पोलिसांना देण्यात आली. साकोली ठाण्यातील पोलीस कर्मचारी ब्रम्हा गावतूरे यांनी आपल्या इतर कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले. पाहणी केली असता मृतक हा तलावात जाळे टाकण्यासाठी कपडे काढून जात होता. मृतदेहाच्या बाजूला एका थैलीमध्ये मासे पकडणारा जाळ आढळून आला.

सायंकाळी त्या दिवशी साकोली तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. ज्याठिकाणी मासेमाराचा मृतदेह आढळून आला. त्याच्या काही अंतरावर जमिन खोदल्याचे दिसून आले. यामुळे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे त्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरीता रूग्णालयात पाठविण्यात आले. मासेमाराचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र मासेमाराचा मृत्यू अंगावर वीज कोसळल्याने झाला असावा असा तर्क लावला जात आहे.