29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ बोनससाठी आला निधी, दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा

बोनससाठी आला निधी, दीड लाख शेतकऱ्यांना दिलासा

0
1335

blank

गोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना शासनाने बोनस जाहीर केला होता. या बोनसची रक्कम तब्बल सहा महिन्यांनंतर शनिवारी (दि. १४) प्राप्त झाली असून, बोनसची रक्कम बुधवारपासून १,५६,४३२ धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यां शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती आहे. बोनससाठी निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून शासनाकडून बोनस जाहीर केला जातो. गेल्या वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने धानाला प्रतिहेक्टर २० हजार रुपये बोनस दोन हेक्टरपर्यंत जाहीर केला होता. पण यासंदर्भातील आदेश निघण्यासाठी तीन महिने लागले होते. तर त्यानंतर बोनससाठी निधी उपलब्ध होण्यास तीन महिने लागले. गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या नजरा बोनसची रक्कम कधी खात्यावर जमा होते, याकडे लागले होते. आठ दिवसांपूर्वी खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बैठक घेऊन बोनससाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९०० कोटी रुपयांचा निधी मार्केटिंग फेडरेशनला लगेच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. यानंतर शासनाने शनिवारी मार्केटिंग फेडरेशनला बोनससाठी निधी उपलब्ध करून दिला असून, यासंबंधीचे पत्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकरी बोनससाठी पात्र ठरले असून, त्यासाठी १८० कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बुधवारपासून (दि. १८) शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम वळती करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी सांगितले.

blank