29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला जिल्ह्यात सुरुवात

बालमृत्यू कमी करण्यासाठी ‘स्टॉप डायरिया’ अभियानाला जिल्ह्यात सुरुवात

0
42

blank

बुलडाणा,दि. 20 : जिल्ह्यात पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी 16 जून ते 31 जुलै 2025 दरम्यान ‘स्टॉप डायरिया’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ स्थानिक नागरी आरोग्य केंद्र, बुलढाणा येथे उत्साहात पार पडला.
उद्घाटन सोहळ्याला जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जवरे, डॉ. सपना मोरे, डॉ. शाकीर यांची उपस्थिती होती. यावेळी आशा स्वयंसेविकांनी ORS (ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन) चे प्रात्यक्षिक करून अतिसारामुळे शरीरातील होणाऱ्या जलशुष्कतेपासून बचाव कसा करता येतो, हे प्रत्यक्ष दाखवले. कार्यक्रमास दीपक महाले (IFM), गणेश परिहार (TSA), पूजा जाधव (LHV), आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील गाव व शहरी भागातील अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्रे व शासकीय संस्था यामधील 0 ते 5 वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अतिसाराची लक्षणे आढळणाऱ्या बालकांना ORS व झिंक सप्लीमेंट तात्काळ दिले जाणार आहे. अभियानासाठी आवश्यक असलेले ORS आणि झिंक पावडरचे साहित्य सर्व अंगणवाडी केंद्रे व आरोग्य संस्थांमध्ये आधीच वितरित करण्यात आले आहे. यासोबतच स्तनपान प्रोत्साहन, रोटा व्हायरस लसीकरण, हातांची स्वच्छता, सुरक्षित पाण्याची उपलब्धता यासारख्या आरोग्यविषयक बाबतीत मार्गदर्शन दिले जाणार आहे.
अंगणवाडीतील बालकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकविण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानात आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नगर परिषद, शिक्षण विभाग आदींचा समन्वयाने सहभाग असून, अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.
00000
blank

blank