
गोंदिया,दि.२६ ऑगस्ट -तालुक्यातील कामठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली. आणि राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.
मोबाइल व्हॅनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात डॉ. तुषार डहाट (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. पलाश गणवीर (स्त्रीरोग तज्ज्ञ) आणि डॉ. त्रिपाठी (मुखरोग तज्ज्ञ) यांनी तपासणी केली. तपासणी झालेल्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
या भेटीदरम्यान, डॉ. वाघमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाचा आढावा घेतला. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. विजय आखाडे हे देखील उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश मेश्राम, आरोग्य सहायक श्री. वंजारी, तालुका पर्यवेक्षक श्री. विंधालोरे, आरोग्य सहायक श्री. ढेंगे, श्री. नागपूरे, आरोग्यसेविका पी.डी. बोरकर, तसेच श्री. लोंढे, श्री. मेश्राम, श्री. गुरू, श्री. चौधरी आणि इतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.





