मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईकडे मोर्चा घेऊन येणार आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आज (26 ऑगस्ट) स्पष्ट निर्देश दिले की, पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही. शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करण्यासाठी प्रशासनाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे, असे हायकोर्टाने स्पष्ट केले.
न्यायालयाने म्हटले की, आझाद मैदानाऐवजी सरकारने खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. मुंबईतील वाहतुकीवर आणि सार्वजनिक जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जरांगेंच्या मोर्चाला आझाद मैदानात तातडीने परवानगी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगे म्हणाले की, आम्ही कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करू. “आम्ही 100 टक्के मुंबईत जाणार, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही. न्यायदेवता न्याय देईल, आम्हाला खात्री आहे,” असे ते म्हणाले. आंदोलनासाठी कोर्ट परवानगी देईल, असा त्यांचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरकारकडून सतत विलंब होत असल्याचा आरोप करत जरांगे यांनी स्पष्ट केलं की, आमच्या मागण्या न्याय्य असून त्या पूर्ण न झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. “जनतेचं गाऱ्हाणं न्यायदेवता नक्की ऐकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनाचा मार्ग नकाशा :
जरांगे यांनी आपला मोर्चा 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीवरून सकाळी 10 वाजता काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. हा मोर्चा पैठण–शेवगाव–कल्याण फाटा–आळे फाटा–शिवनेरी (जुन्नर मुक्कामी) मार्गे जाणार आहे. दुसऱ्या दिवशी, 28 ऑगस्टला खेड–चाकण–लोणावळा–वाशी–चेंबूर मार्गे रात्री आझाद मैदानात पोहोचण्याचा त्यांचा बेत आहे. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





