तिरोडा,दि.३१–कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅनद्वारे शहरासह ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जात आहे.तिरोडा तालुक्यात 30 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ईंदोरा येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 111 नागरिकांनी मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आपली तपासणी केली असुन त्यात 70 मुख कर्करोग,32 महिलांची गर्भाशय कर्करोग व 9 महिलांची स्तन कर्करोग संबधाने तपासणी केल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ.आदित्य दुबे यांनी यावेळी दिली आहे.मोबाईल व्हॅनमध्ये ए.सी.तपासणी कक्ष असून मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र आहे.
मोबाइल कॅंसर व्हॅनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सविता लोणेर,मुखरोग तज्ज्ञ डॉ.अनिल आटे व शल्यचिकित्सक डॉ.तुषार डहाके,स्टाफ नर्स वर्षा पारधी व छबीता भगत यांनी लाभार्थ्यांची विविध तपासणी केली.तपासणीअंती 6 संशयितांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
कॅन्सर तपासणी शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी व वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य दुबे व डॉ.रुपेश झोडे यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.कॅन्सर तपासणी शिबिराला पदाधिकारी जि.प.सदस्य चत्रभुजजी बिसेन व पं.स.सदस्य हुपराजजी जमईवार यांनी भेट देवुन पाहणी केली आणि यावेळी अधिकाधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.सर्व सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक व सहायिका, आरोग्य सेवक व सेविका, आशा सेविका,परिचर व इतर सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या मदतीने व जाणभागीदारीने हे कर्करोग तपासणी शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाले.





