चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अपघाताची मालिका सुरु आहे, दोन दिवसात तीन नागरिकांचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले आहे, या मालिकेत ३० सप्टेंबर रोजी बाबुपेठ भागातील जुनोना मार्गावर ३४ वर्षीय इसमाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला, यावेळी जुनोना मार्गावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी पुढाकार घेतला मात्र पोलिसांनी त्यांची कॉलर पकडून ताब्यात घेतले.आज सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान राकेश गौतम तेलंग हा आपल्या दुचाकीने घराकडे जात होता, त्यावेळी मार्गावर चारचाकी वाहन थार हे उभे होते अचानक त्या वाहनातील इसमाने दरवाजा उघडला, यामुळे राकेश चे दुचाकीवरील नियंत्रण सुटले असता त्याची दुचाकी थेट एसटी बसच्या मागच्या चाकात सापडली. राकेश सुद्धा दुचाकीसह मागच्या चक्क्यात सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आणि त्याठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु केले, अपघाताबाबत माहिती मिळताच आप चे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे घटनस्थळी दाखल झाले, मृतकाच्या कुटुंबाला न्याय द्यावा व जुनोना मार्गावर गतिरोधक व्हावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली, जुनोना मार्गावर नागरिकांची चांगलीच गर्दी जमली.
रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोडगा निघाला नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांनी आप जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांची कॉलर पकडत त्यांना धक्काबुक्की करीत ताब्यात घेतले. एखाद्या गुन्हेगाराला नेल्यासारखं पोलिसांनी कृत्य केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.





