जीवनात कधी कधी काळ असा फिरतो की, क्षणात सर्व काही बदलतं…
चिवरा (ता. मालेगाव) येथील जया योगेश सरकटे यांच्या आयुष्यात असाच काळ आला.पती योगेश सरकटे हे वनविभागात कार्यरत होते. ते कर्तव्यावर जात असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले.
अचानक आलेल्या या दुःखाने घर कोलमडून पडलं.
दोन चिमुकली लेकरं, वयोवृद्ध सासू-सासरे, आणि उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते… जया सरकटे यांच्या आयुष्यात एका क्षणात काळोख पसरला. घरात दोन चिमुकली मुलं, वयोवृद्ध सासू-सासरे आणि उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसलेली अत्यंत कठीण परिस्थिती त्यांच्या समोर उभी राहिली. असं असतांनाही त्यांनी हिंमत सोडली नाही.
घरातील एकमेव आधार हरवला होता, भविष्य अंधारमय वाटत होतं. परंतु या प्रतिकूलतेतही जयांनी हार मानली नाही. शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक धोरणामुळे त्यांना राज्य शासनाच्या वनविभागा अंतर्गत वाशिम उपवनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कार्यालयात नियुक्ती मिळाली आहे.
ही केवळ नोकरी नाही, तर नव्या आशेचा किरण आहे असे त्यांनी सांगितले. आपल्या मुलांसाठी जगण्याचं बळ आणि वृद्ध सासू-सासऱ्यांसाठी आधार. नोकरीत रुजू झाल्यानंतर जयांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीनं आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा करण्याचा संकल्प केला आहे.
आजपासून त्या आत्मविश्वासाने आपलं जीवन नव्याने उभं करत आहेत. कामाच्या ठिकाणी त्यांच्या मेहनतीला आणि प्रामाणिकतेला अधिकारी व सहकाऱ्यांचा सन्मान मिळणार आहे. एकेकाळी अडचणींच्या गर्तेत असलेल्या या कुटुंबाने आता पुन्हा स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग धरणार आहेत.
आज जया सरकटे जबाबदारीनं आपलं कर्तव्य पार पाडणार आहेत .कष्ट, आत्मविश्वास आणि शासनाच्या संवेदनशील धोरणामुळे त्यांनी संकटावर मात केली आहे.आधार नव्हता, पण आशा होती — की शासनाकडून काही तरी दिलासा मिळेल.
आई, सून, आणि आता शासकीय कर्मचारी या सर्व भूमिकांमध्ये त्या समर्थपणे उभ्या राहिल्या राहतील हे निश्चित.
जया यांची ही कहाणी म्हणजे संघर्षातून उभारी घेणाऱ्या स्त्रीची जिद्द, आत्मविश्वास आणि शासनाच्या संवेदनशील धोरणातून मिळालेल्या नवजीवनाची प्रेरणादायी यशोगाथा आहे. त्यांनी शासनाचे आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.
संकलन : अनिल कुरकुटे ,जिल्हा माहिती कार्यालय ,वाशिम





