गोंदिया,दि.०६-हृदयविकार हा जगातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. दरवर्षी नविन थीमच्या माध्यमातून लोकांना हृदयरोगांबद्दल जागरूक करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. हृदयरोग हा जगभरात मृत्यूंचे प्रमुख कारण असून नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो.त्यादिनाचे औचित्य साधुन त्याच दिवशी के.टि.एस. सामान्य रुग्णालय येथे कार्यक्रम संपन्न झाला.जागतिक हृदय दिन कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,डॉ.पोषण बिसेन,डॉ.अनिल आटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
डॉ.पटले यांनी जागतिक हृदय दिवसासाठी २०२५ ची संकल्पना “डोन्ट मिस ए बीट” (Don’t Miss a Beat) आहे, जी हृदयाच्या प्रत्येक ठोक्याचे महत्त्व सांगते आणि हृदयविकारांना प्रतिबंध करण्यासाठी व यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने लक्ष देण्याचे आवाहन करत असल्याचे सांगितले.
डॉ.अभिजीत गोल्हार यांनी ही थीम आपल्याला हृदयाचे आरोग्य कसे जपावे आणि त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य पावले उचलावीत व हृदयाच्या प्रत्येक ठोक्याचे महत्त्व ओळखण्याचे सांगितले.
डॉ.तृप्ती कटरे यांनी हृदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि हृदय आरोग्याविषयीची जागरूकता वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
डॉ.पोषण बिसेन यांनी आहारा बाबत विस्तृत माहिती दिली.त्यात संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने, फळे आणि भाज्यांनी युक्त संतुलित आहार हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो.तसेच, फॅटी खाद्यपदार्थ आणि साखरयुक्त पेये यांसारख्या पॅकेज केलेले आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांचे सेवन कमी करणे आवश्यक आहे.कमी साखर, कोलेस्टेरॉलची पातळी, ट्रान्स फॅट्स आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे हृदयविकाराचा धोका कमी होत असल्याचे सांगितले.
डॉ.अनिल आटे यांनी तंबाखू व मौखिक आरोग्याचा हृदयरोगावर होणारा परिणाम याबाबत सर्वसामान्यांचे मार्गदर्शन केले त्यात प्रामुख्याने धूम्रपान हा हृदयविकारासाठी सर्वात सामान्य जोखीम घटकांपैकी एक आहे.आणि सोडल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो आणि त्याच वेळी संपूर्ण हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही, निष्क्रिय धुराचा दीर्घकाळ संपर्क हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो.
जागतिक हृदय दिवस कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी,डॉ.कांचन भोयर,आरती लिल्हारे, डिंपल राघोर्ते, मोनाली काटवले,विवेकानंद कोरे, भाविका बघेले यांचे सहकार्य लाभले.





