25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ २३०९ हेक्टरवरील नुकसान;६३९८ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

२३०९ हेक्टरवरील नुकसान;६३९८ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

0
112

गोंदिया : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ६३९८ नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील २३०९.४६ हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकाकरिता ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने १८ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली आहे.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य मान्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबींकरितादेखील विहित दराने मदत देण्यात येते. सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यात विविध जिल्ह्यांत ‘अतिवृष्टी व पूर’ यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये ३ कोटी ५० लाख २१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

नुकसानभरपाईची रक्कम डीबीटीद्वारे
नुकसानभरपाईची रक्कम जिल्ह्यातील ६३९८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बैंक खात्यात निधी वितरित केला जाणार आहे. सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतपिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही.

मदत वाटपानंतर यादी होणार प्रकाशित
लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळता करू नये, याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असेही आदेश महसूल विभागाच्या वतीने १८ ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकातून देण्यात आले आहे

blank