तिरोड्यात ‘मंथन मंडल यात्रे’चे उत्स्फूर्त स्वागत; ओबीसी पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
तिरोडा:ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी राज्यभरात जनजागृती करत निघालेल्या ‘मंथन मंडल यात्रे’चे तिरोडा येथे ओबीसी समाज बांधवांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ओबीसी अधिकार मंचचे संयोजक खेमेंद्र कटरे यांनी, “जातनिहाय जनगणनेसाठी लढा देणे हा प्रत्येक ओबीसी बांधवाचा घटनात्मक हक्क असून, या न्याय्य हक्काच्या लढ्यात सर्वांनी पूर्ण ताकदीने एकत्र उभे राहावे,” असे आवाहनात्मक प्रतिपादन केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, जातनिहाय जनगणना झाल्यास त्याचा थेट फायदा समाजातील युवक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच प्रशासकीय सेवेत आणि धोरण निर्मितीत ओबीसी समाजाला त्यांचा हक्काचा वाटा व अधिकार मिळण्यासाठी ही जनगणना अत्यंत आवश्यक आहे.
या स्वागत सोहळ्याला आणि सभेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे महासचिव मनोज मेंढे, कैलास भेलावे,ओबीसी सेवा संघाचे निखील बनसोड महेंद्र बिसेन, युवा बहुजन मंचचे सुनील भोंगाडे, रवी भांडारकर,गौरव बिसेन,अशोक काकडे,शंकर पाल,श्रीकृष्ण पडोळे तसेच ओबीसी विद्यार्थी आघाडीचे गौरव बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी तिरोडा तालुका ओबीसी संघटनेचे पदाधिकारी ए. डी. शरणागत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेवक पी. आर. पारधी, वाय. बी. चव्हाण, पी. टी. रंगारी, पी. एल. पारधी, सी. बी. बोपचे, प्रदीप पटले, मनोज गेडाम, दिलीप शेंडे, पृथ्वीराज पटले, एस. डी. कटरे आणि ए. डी. शरणागत यांच्यासह तिरोडा तालुका ओबीसी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.





