26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Featured News जावयाच्या सन्मानाने उजळली बलिप्रतिपदा

जावयाच्या सन्मानाने उजळली बलिप्रतिपदा

0
141

सावरटोला येथे साडी-चोळी देऊन लेकीचा सन्मान : गावकऱ्यांनी परंपरा ठेवली कायम

गोंदिया : दिवाळीचा पाडवा बलिप्रतिपदा, प्रेम, आपुलकी आणि संस्कारांची सांगड घालणारा दिवस. या दिवशी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला गावात मागील दहा वर्षांपासून सुनील तरोणे यांच्या पुढाकारातून एक आगळावेगळा नवदाम्पत्य सन्मान सोहळा हा उपक्रम राबविला जात आहे. लग्न होऊन पहिल्यांदाच दिवाळीत माहेरी व सासरी येणाऱ्या जावई व मुलीचा साडी चोळी, शाल, पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन सन्मान केला जातो. या माध्यमातून नवदाम्पत्याला आपुलकी, प्रेम आणि नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यात आली. हा उपक्रम बुधवारी (दि. २२) पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता जिजाऊ पूजनाने झाली. पूजन विष्णूप्प्रसाद अग्रवाल यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, लोकपाल गहाणे किशोर तरोणे, सरपंच युवराज तरोणे, राजेश मुनेश्वर, यादवराव तरोणे, राधेश्याम तरोणे, चिंतामण तरोणे, पांडुरंग भोपे, मनोहर तरोणे, देवराम तरोणे, संजय राऊत, रघुनाथ शिवणकर, कुरुंदा वैद्य, भीमराव रामटेके, सचिन शिवणकर, गोवर्धन मुनेश्वर, संदीप तरोणे व रामदास बोरकर उपस्थित होते. यावेळी कुमुद हरिश्चंद्र भंडारकर (मरेगाव), दामिनी हरीश आंबेडारे (आसोली) व वर्षा पंकज दोनोडे (रनाडा) या नवदाम्पत्याचा साडी-चोळी, शाल, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील व स्नेहल तरोणे यांनी केले. गुरुदेव सेवा मंडळाचे तरुण युवक-युवती आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम अविस्मरणीय केला.

संस्काराची परंपरा जपणारे गाव म्हणजे सावराटोला -लायकराम भेंडारकर
मजबुती आणि गावाच्या संस्कृतीचा संस्कारांची परंपरा जपणारे सावरटोला हे गाव म्हणजे एक संस्कारांचे विद्यापीठच आहे. जावयाचा सन्मान म्हणजे नात्यांची गौरव. दिवाळीच्या धावपळीतही सावरटोला ग्रामस्थांनी प्रेम, स्नेह, आदराचा दीप प्रज्वलित करून बलिप्रतिपदेचा खरा अर्थ उजळविला. या अनोख्या सन्मान सोहळ्याने जावयाच्या सन्मानाने बलिप्रतिपदा उजळली, असं म्हणणं वावगं ठरणार नाही, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.

blank