नांदेड: दि 27-सलाम मुंबई फाउंडेशन, शिक्षण विभाग व आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट तालुक्याच्या आदिवासी भागातील गोंडजेवली तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत दिवाळी सणानिमित्त “एक पणती व्यसनमुक्तीसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.
देशाची नवी पिढी व्यसनमुक्त राहावी म्हणून विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेऊन जनजागृती केली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरी, अंगणात, रांगोळी काढून पणत्या प्रज्वलित केल्या आणि व्यसनमुक्त व आरोग्यसंपन्न परिवार व समाज राहावा, यासाठी प्रार्थना केली.व्यसन हे माणसाच्या आयुष्याचा नाश करते. परिवाराचा समाजातील मानसन्मानाचा स्तर खालावून अधोगतीला नेते. व्यसनमुक्त राष्ट्रनिर्मितीसाठी समाजातील व्यक्ती व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी मुख्याध्यापक आंबादास राठोड यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी वृद्धिंगत व्हाव्यात आणि मुले, समाजातील व्यक्ती व्यसनापासून दूर राहावीत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाईट सवायी लागू नये. मुले व्यसनापासून दूर राहावीत म्हणून शाळेत अनेक उपक्रम राबविले आहेत. यापुर्वी आपट्यांच्या पानावरुन व्यसमुक्तीसाठी जनजागृती, तंबाखूजन्य पदार्थाची होळी,चर्चासत्र, डॉक्टर डे व आरोग्य तपासणीच्या दिवशी निमित्य परिसंवाद अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे दिले.यासाठी उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेत राबविण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षणविस्तार अधिकारी संजय कराड , केंद्रप्रमुख सत्यनारायण कौड, सलाम मुंबई फाउंडेशनचे अजय पिळणकर,संजय ठाणगे प्रतिनिधी यांनी कौतुक केले आहे.





