23.6 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ आरटीओ कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून उपोषण

आरटीओ कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून उपोषण

0
94

गोंदिया : परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी नवीन आकृतिबंधास सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरही दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक होऊनही त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे मोटार वाहन विभागातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यात गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी सुद्धा सहभागी होणार आहेत. परिवहन विभागात ६६ प्रशासकीय अधिकारी पदांवर पदोन्नती रखडली आहे. सेवा प्रवेश नियमावर बोट ठेवत कार्यालयीन अधीक्षकांकडून पदोन्नती नाकारली जात आहे. ७० कर्मचाऱ्यांना पदोन्नतीविनाच सेवानिवृत्त व्हावे लागले. यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. प्रताप सरनाईक यांच्यापुढे दिवाळीपूर्वी ही सगळी वस्तुस्थिती मांडली. सेवाभरती नियम नसल्याने पदोन्नती नाही, असा बचाव परिवहन विभागाने केला. सरनाईक यांनी आरटीओ कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मकता दर्शवत एका आठवड्यात कालबद्ध पदोन्नती आणि विभागीय पदोन्नतीचे आदेश काढण्याच्या सूचना आयुक्त विवेक भिमनवार यांना दिल्या. मात्र, आठवडाभरानंतरही पदोन्नतीबाबत कोणतेही आदेश निघाले नाहीत.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला सरकारने दिलेली आश्वासनेही पाळली जात नाहीत. मोटार वाहन कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी परिवहन विभागाच्या मुख्यालय परिसरात बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. सरकारने आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा न काढल्यास बेमुदत संप करण्यात येणार आहे.
– धनराज पुरी, कार्यालयीन अधीक्षक

blank