41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता सेवानिवृत्त बीडीओंच्या वाशिम येथील निवासस्थानाला एसीबीने ठोकले सील!

सेवानिवृत्त बीडीओंच्या वाशिम येथील निवासस्थानाला एसीबीने ठोकले सील!

0
308

blank

हिंगोली,दि.२९ : कळमनुरी पंचायत समितीचे तत्कालिन गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांच्याकडे त्यांच्या उत्पन्ना पेक्षा अधिकची अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणात मनोहर खिल्लारी यांच्यासह त्यांची पत्नी सौ. रेखा खिल्लारी यांच्यावर गुन्हा दाखल केला. वाशिम येथील त्यांच्या निवासस्थानी एसीबीचे पथक  निवास्थानी झडतीसाठी गेले असता ते बंद आढळून आल्याने एसीबीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानाला सील ठोकले.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दिलेली माहिती अशी की, कळमनुरी पंचायत समितीचे तत्कालिन गटविकास अधिकारी मनोहर लक्ष्मण खिल्लारी व त्यांची पत्नी सौ. रेखा खिल्लारी यांचे परिक्षण कालावधी १ जानेवारी २००५ ते १५ मार्च २०२२ मध्ये एकुण उत्पन्न १ कोटी ४३ लाख ९ हजार ७४६ रुपये आहे. परिक्षण कालावधीत त्यांची एकुण मालमत्ता ९७ लाख ३८ हजार ०९ रुपये आहे. परिक्षण कालावधीत त्यांचा एकुण खर्च ८९ लाख ७७ हजार ५१२ रुपये आहे. मनोहर खिल्लारी व त्यांची पत्नी सौ. रेखा खिल्लारी या दोघांचा खर्च व एकुण मालमत्ता १ कोटी ८७ लाख १५ हजार ५२१ रुपये यामधून दोघांचे एकुण उत्पन्न १ कोटी ४३ लाख ९ हजार ७४६ रुपये वजा जाता त्यांच्याकडे ४४ लाख ५ हजार ७७५ इतकी अधिकची (अपसंपदा) त्यांच्या उत्पन्ना पेक्षा जास्त आहे. या दोघांच्या अपसंपदेची गणना केली असता अपसंपदाही + ३०.७८ इतकी संपादीत केल्याचे निष्पन्न झाले. ्रत्यामुळे मनोहर खिल्लारी यांनी स्वत: व पत्नी सौ. रेखा खिल्लारी यांनी एकुण उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा ४४ लाख ५ हजार ७७५ रुपये इतकी म्हणजेच + ३०.७८ टक्के इतकी अपसंपदा संपादीत केल्याचे निष्पन्न झाल्याने २७ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश मल्लपिल्लू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळमनुरी पंचायत समितीचे तत्कालिन गटविकास अधिकारी मनोहर लक्ष्मण खिल्लारी रा.माऊली नगर गोरे लेआउट प्लॉट नं. ४१ झाकळवाडी रोड लाखाळा वाशिम व त्यांची पत्नी सौ. रेखा मनोहर खिल्लारी उर्फ सगुणा रमेश कांगणे या दोघा विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मनोहर खिल्लारी यांनी प्राप्त केलेली अपसंपदा सौ. रेखा खिल्लारी यांनी स्वत:च्या नावे बाळगुण गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावरही विविध कलमान्वये हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात मनोहर खिल्लारी यांच्या वाशिम येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिमचे पथक गेले असता सदर निवासस्थान बंद व निवासस्थानाला कुलूप असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिस निरीक्षक अल्का गायवâवाड यांच्या स्वाक्षरीची नोटीस मनोहर खिल्लारी यांच्या निवास्थानाच्या मुख्य भिंतीवर चिटकविण्यात आली आहे.त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या मातोश्री नावाच्या निवासस्थानाला सील ठोकुन दोन्ही आरोपींच्या शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक विकास घनवट हे करीत आहेत.

महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये कळमनुरी पंचायत समितीचे तत्कालिन गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावरून ही चौकशी केली असता शासकीय सेवेतून मिळालेले वेतन व इतर ज्ञात साधनापासून मिळालेल्या कायेदशीर उत्पन्नापेक्षा अधिक ४४ लाख ५ हजार ७७५ रुपये अपसंपदा रक्कम ही त्यांची पत्नी रेखा खिल्लारी यांच्यासह मुलाच्या नावे बाळगल्याचे निष्पन्न झाले.

blank