23.1 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home क्रीडा जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सवात समूह गायनात इंजोरी शाळेची विजयी हॅट्रिक

जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सवात समूह गायनात इंजोरी शाळेची विजयी हॅट्रिक

0
36

अर्जुनी-मोर. (सुरेंद्रकुमार ठवरे)-तालुक्यातील अवघ्या ४६५ लोकसंख्या असलेले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे मूळ गाव असलेले संतनगरी इंजोरी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात समूह गायन स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून विजयी हॅट्रिक साधली आहे.
पूर्वी केवळ १५ विद्यार्थी असलेल्या या शाळेची पटसंख्या आज ३१ वर पोहोचली असून, आजूबाजूच्या ६ ते ७ गावांतील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. हे यश मुख्याध्यापक रोकडे व सहाय्यक शिक्षक लाखेश्वर लंजे यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून त्याचा थेट लाभ शाळेच्या यशातून दिसून येतो.
मागील तीन वर्षांत शाळेने सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
२०२३ मध्ये एकल गायन, समूह गायन व नाटिका – प्रथम क्रमांक,
२०२४ मध्ये समूह गायन व नाटिका – प्रथम क्रमांक,
तर २०२५ मध्ये समूह गायन व एकल गायन – प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यशामागे जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, रविंद खोटेले (माजी सरपंच), मोरेश्वर मेश्राम (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), सर्व पालकवर्ग व गावकरी बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
चौकट
इंजोरी हे माझे छोटेसे गाव आहे. मागील आठ–नऊ वर्षांपासून येथील दोन्ही गुरुजी शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सांस्कृतिक उपक्रमांमध्ये स्वतः पूर्ण झोकून देतात. त्यांच्या कार्यामुळे गावाच्या शाळेचा नावलौकिक वाढला असून, संपूर्ण गावाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. हे दोन्ही गुरुजी खऱ्या अर्थाने उत्कृष्ट शिक्षक आहेत.
— लायकराम भेंडारकर अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

blank