अर्जुनी मोरगाव-भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (७५ वर्षे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राईट मीडिया वेल्फेअर असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने “संविधान वाचन (पुष्प दुसरे)” या उपक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील लहानशा सुरगाव येथे शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता एक ते ५१ कलमांचे सामूहिक संविधान वाचन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सुरगाव येथील रमाई बौद्ध विहार परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात संविधानाचे वाचन हे केवळ औपचारिक न राहता, ते लोकशिक्षण, लोकजागृती आणि लोकशक्तीच्या पुनरुज्जीवनाचे माध्यम ठरले, असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
संविधान म्हणजे केवळ ग्रंथ नाही, तर जगण्याची दिशा – भागवतजी लांडगे
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले संविधान वाचक मान. भागवतजी लांडगे, ज्येष्ठ पत्रकार, लेखक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राईट मीडिया वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष. त्यांनी संविधानातील कलमांचे वाचन करताना प्रत्येक कलमामागील सामाजिक, राजकीय व मानवी मूल्ये सोप्या भाषेत उलगडून सांगितली.
“संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून, सामान्य माणसाच्या स्वाभिमानाचे, अधिकारांचे आणि कर्तव्यांचे संरक्षक कवच आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर तरोणे माजी जिल्हा परिषद सदस्य, नवेगाव बांध हे होते. स्वागताध्यक्ष म्हणून सौ. सीमा शेंडे, ग्रामपंचायत सदस्य, सावरटोला यांनी जबाबदारी सांभाळली.प्रमुख पाहुण्यांमध्ये युवराज तरोणे, प्रमोदजी खोब्रागडे, चंद्रकुमार मेश्राम, रामरतनजी खोब्रागडे व सरिताताई रामटेके यांची विशेष उपस्थिती लाभली.
सुरगाव हे अवघ्या चाळीस कुटुंबांचे छोटेसे गाव असले तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. संविधान वाचनानंतर प्रत्येक कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखांच्या हस्ते संविधानाचे पुस्तक देण्यात आले.
यामुळे सुरगाव हे ‘घरघर संविधान’ अभियानाअंतर्गत शंभर टक्के संविधान असलेले गाव ठरले असून, हा उपक्रम ग्रामीण भारतातील लोकशाही सुदृढतेचा आदर्श नमुना ठरत आहे.
आजही संविधानाविषयी अज्ञान, गैरसमज व उदासीनता आढळते. अशा परिस्थितीत दुर्गम व ग्रामीण भागात संविधान थेट घराघरात पोहोचवण्याचा हा उपक्रम लोकशाही बळकट करणारा आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम असून, इतर गावांसाठीही तो प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. आंबेडकर राईट मीडिया वेल्फेअर असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत असून, संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा कार्यक्रम फक्त सुरगावातच नव्हे तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात साजरा करण्यात यावा असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी व्यक्त केले.





