24.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home मराठवाडा/खान्देश पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिकेत विजयी

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिकेत विजयी

0
28
जालना-पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोप असलेला श्रीकांत पांगारकर याने जालना महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. श्रीकांत पांगारकरने जालना महानगरपालिकेची निवडणूक वॉर्ड नंबर 13 मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती. या निवडणुकीत श्रीकांत पांगारकर विजयी झाला आहे. निवडणूक जिंकल्यानंतर श्रीकांत पांगारकरने आपल्या कार्यकर्त्यांबरोबर विजयाचा जल्लोष केला.
नोव्हेंबर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत श्रीकांत पांगरकर शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले होते.शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला होता. पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची लगेच जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीही करण्यात आली होती. त्यांच्या प्रवेशावर लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी पांगारकरच्या पक्षप्रवेशास स्थगिती दिली होती. पांगारकर 2001 ते 2006 दरम्यान जालना महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक होते.
2011 मध्ये पक्षाचे तिकीट नाकारल्यानंतर ते उजव्या विचारसरणीच्या हिंदू जनजागृती समितीत समील झाले होते. ऑगस्ट 2018 मध्ये, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यातील विविध ठिकाणांहून स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केल्याप्रकरणी पांगारकर यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध स्फोटके कायदा, स्फोटके पदार्थ कायदा आणि प्रतिबंध (यूएपीए) कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2024 मध्ये श्रीकांत पांगारकर यांना जामीन मंजूर केला. 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या छातीवर आणि डोक्यावर गोल्या लागल्या होत्या. हा हल्ला इतका भयानक होता की गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं देशभरात एकच खळबळ उडाली होती. कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत एकूण 18 जणांनी ओळख पटवली असून 17 जणांना अटक केली आहे. गौरी लंकेश या विवेकवादी विचारसरणीच्या होत्या. त्यांच्या हत्येनंतर पत्रकार आणि बुद्धिजिवींनी शांततेच्या मार्गाने रोष व्यक्त केला होता.
पांगारकरला दोन प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती. एक कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने लंकेश हत्या प्रकरणासाठी आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा शस्त्रास्त्र जप्ती प्रकरणात अटक केली होती. जामिनावर सुटण्यापूर्वी पांगारकर आर्थर रोड तुरुंगात होता.

blank