:आरोपीकडून पीडित व साक्षीदारांना जीवे मारण्याच्या धमक्या..
अकोला | प्रतिनिधी-अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल असलेला व गंभीर गुन्हेगारी इतिहास असलेला आरोपी गोपाळ रामकृष्ण दांदळे याच्याबाबत जिल्हा सत्र न्यायाधीश-१ यांच्या न्यायालयात मंगळवार, दिनांक 20 जानेवारी रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आरोपीच्या अटकेसंदर्भात व पुढील न्यायालयीन कार्यवाहीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विनयभंगाचे कलम तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कठोर कलमे लागू करण्यात आलेली आहेत. तरीही आरोपी अनेक दिवसांपासून फरार असून, पोलिसांना अद्याप त्याला अटक करण्यात अपयश आले आहे.
दरम्यान, आरोपी फरार असतानाच त्याच्याकडून पीडित महिला तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या धमक्यांबाबत पीडित महिलेने खदान पोलीस स्टेशन, अकोला येथे लेखी तक्रार दाखल केली असून, धमकी, दबाव व भीतीचे वातावरण निर्माण केल्याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, सदर तक्रारीवर प्राथमिक स्वरूपात एम.सी. (माहिती नोंद) करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईचा विचार सुरू आहे. मात्र विनयभंग व ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल असतानाही आरोपी मोकाट फिरत असल्याने, पीडित व साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कायदेतज्ज्ञांच्या मते, विनयभंग व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असताना आरोपीकडून साक्षीदारांना धमकावणे हा स्वतंत्र व गंभीर अपराध ठरतो. अशा परिस्थितीत तातडीची अटक, संरक्षण आदेश आणि कठोर प्रतिबंधात्मक कारवाई आवश्यक असते. 20 जानेवारी रोजी होणाऱ्या सत्र न्यायालयातील सुनावणीत या सर्व बाबींचा विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पीडित महिलेने पोलिस प्रशासनाकडून तात्काळ संरक्षण, आरोपीची अटक तसेच धमकी प्रकरणात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्याची ठाम मागणी केली असून, न्याय न मिळाल्यास वरिष्ठ अधिकारी व संबंधित आयोगांकडे दाद मागण्याचा इशाराही दिला आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर संपूर्ण अकोला शहराचे लक्ष लागले आहे.





