केंद्रीय मंत्र्यांचे कठोर निर्देश; नागरिकांची सुरक्षितता व पर्यावरण संरक्षणावर भर
गोंदिया :गोंदिया–बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अत्यंत संथ, अपूर्ण व निष्काळजी बांधकामामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व पर्यावरणीय संस्था वृक्षधरा फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने मंत्र्यांना माहिती दिली की हा राष्ट्रीय महामार्ग सध्या सोयीऐवजी नागरिकांसाठी गंभीर अडचणींचा विषय ठरत आहे. रस्त्याचे अनेक भाग अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी खोल खड्डे पडलेले आहेत. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात वारंवार होत असून, रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच धोकादायक बनते.
धुळीमुळे वाढत आहेत आजार-बांधकामाच्या संथ गतीमुळे उडणाऱ्या धूळ-मातीचा फटका परिसरातील ग्रामीण व शहरी भागांना बसत आहे. दमा, अॅलर्जी व श्वसनविकारांचे प्रमाण वाढत असून, याचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांवर होत असल्याचे वृक्षधरा फाउंडेशनने निदर्शनास आणून दिले.
वृक्षतोड झाली, रोपण नाही-रस्ता रुंदीकरणाच्या कामात १०० वर्षांहून अधिक जुने शेकडो वृक्ष तोडण्यात आले. मात्र नियमानुसार व प्रमाणानुसार देशी वृक्षांचे रोपण न केल्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला असल्याचा मुद्दाही शिष्टमंडळाने उपस्थित केला.
गडकरी यांचे कठोर निर्देश-या विषयाची गंभीर दखल घेत मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गोंदिया–बालाघाट राष्ट्रीय महामार्गाची प्रत्यक्ष स्थितीची तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच कामाचा दर्जा राखून बांधकाम लवकर पूर्ण करणे, अपघातप्रवण ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्वरित सुधारणा करणे व तोडलेल्या वृक्षांच्या प्रमाणात देशी वृक्षांचे अनिवार्य रोपण करण्याचे स्पष्ट आदेश दिले.जनतेची सुरक्षितता, रस्त्याचा दर्जा व पर्यावरण संरक्षण याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.या वेळी गोंदिया भाजपच्या अध्यक्ष श्रीमती सीता रहांगडाले, वृक्षधरा फाउंडेशनचे सह-संस्थापक तनुज येडे, नागपूर येथील प्रमोद धुवारे व आयुष निधान उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांच्या निर्देशांनंतर महामार्गाच्या कामाला गती मिळेल व नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास वृक्षधरा फाउंडेशनने व्यक्त केला. ही संपूर्ण पहल कोणत्याही राजकीय हेतूने नसून केवळ जनहित, रस्ते सुरक्षा व पर्यावरण संरक्षण या उद्देशाने करण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले.





