26 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ उमरझरी कालव्यालगत वाळू उपसा व झाडतोडीबाबत;प्रशासनाची डोळेझाक

उमरझरी कालव्यालगत वाळू उपसा व झाडतोडीबाबत;प्रशासनाची डोळेझाक

0
60

गोंदिया,दि.२१- जिल्ह्यातील उमरझरी कालव्यालगतच्या परिसरात गावकऱ्यांच्या माहितीनुसार, या भागात रात्री-अपरात्री वाहनांची व यंत्रसामग्रीची वर्दळ, नाल्यांमधून वाळू काढली जात असल्याचे प्रकार तसेच कालव्यालगत झाडतोड सुरू असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या प्राप्त माहितीनंतर, सेवा संस्थेच्या प्रतिनिधींसह व स्थानिक गावकऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित स्थळाची प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण करण्यात आले. सदर पाहणीदरम्यान FDCM च्या जांभडी-1 वनपरिक्षेत्रातील कम्पार्टमेंट क्रमांक 527 व 518 तसेच सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील कम्पार्टमेंट क्रमांक 1510 या भागांमध्ये नाल्यांमध्ये खोल खड्डे पडलेले, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू काढण्यात आल्याची चिन्हे तसेच नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाल्याचे दृश्य स्वरूपात आढळून आले. पाहणीदरम्यान काही ठिकाणी काढलेली वाळू मोठ्या प्रमाणात वनविभाच्या जागेवर साठवून ठेवण्यात आल्याचेही निदर्शनात आले.ज्यावरून अवैध वाळू उपसा व साठवणूक करून उमाझरी कालव्याच्या दुरुस्ती कामासाठी वापर करत असल्याचे निदर्शनात आले आहे. याचबरोबर, सदर परिसरात कालव्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या नैसर्गिक वृक्षांचे नुकसान झाल्याची व काही ठिकाणी ताजी झाडतोड झाल्याची चिन्हे दिसून आली. या सर्व निरीक्षणांमुळे स्थानिक परिसंस्था, पाणीस्रोत तसेच पर्यावरणीय समतोलाबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच सेवा संस्थेच्या वतीने या बाबी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आल्या असून, सदर प्रकरणाची तथ्याधारित तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने या बाबींची योग्य दखल घेऊन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने संतुलित, पारदर्शक व योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

blank