26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ बोलीभाषा लुप्त झाल्यास अनेक संस्कृती लयास जातील : डॉ. शामराव कोरेटी

बोलीभाषा लुप्त झाल्यास अनेक संस्कृती लयास जातील : डॉ. शामराव कोरेटी

0
29
-मराठी विभागात ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमात मराठी बोलीभाषांचे वैविध्य अधोरेखित
नागपूर :बोलीभाषा लुप्त झाल्यास अनेक संस्कृती लयास जातील, असे प्रतिपादन मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी केले. मराठी भाषेतील विविध बोलीभाषांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बोलींचा जागर’ हा कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने विद्यापीठातील मानवशास्त्र सभागृहात गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. कोरेटी बोलत होते.
माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेश धर्मदास लेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून मानवविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, भाषा संचालनालयाचे प्रतिनिधी म्हणून विभागीय सहाय्यक भाषा संचालक बाबासाहेब जगताप (मुख्य समन्वयक) व अधीक्षक संजय कुमार गोरे उपस्थित होते. नागपुरी बोलीवरील मार्गदर्शनासाठी डॉ. अनुजा दारव्हेकर व प्रा. सुरेंद्र गोंडाणे, तर लोधी बोलीसाठी भैय्याजी बसेने व प्रा. संतोष ठकरेले यांची उपस्थिती होती. बालपणापासून आईकडून शिकलेली भाषा म्हणजे बोलीभाषा होय. जर आपण आपली बोलीभाषा विसरलो, तर ते आईला विसरण्यासारखेच आहे. त्यामुळे घरी, बाहेर आणि समाजात आपली बोलीभाषा अभिमानाने वापरावी, असे डॉ. कोरेटी पुढे बोलताना म्हणाले. बोलीभाषेबाबत मनात असलेला न्यूनगंड दूर करून तिचा सन्मान करावा. कारण बोलीभाषा लुप्त झाल्यास त्या मागे असलेल्या अनेक संस्कृतीही नष्ट होतील, असे देखील ते म्हणाले देखील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. मराठी भाषेविषयी घोषवाक्ये, शंखनाद आणि उत्साही वातावरणात शोभायात्रा पार पडली. त्यानंतर अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य समन्वयक श्री बाबासाहेब जगताप यांनी केले. त्यांनी सांगितले की, भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी बोलीभाषा हेच सर्वात सशक्त माध्यम आहे. प्रमाणभाषेत अधिकाधिक बोलीभाषेतील शब्दांचा समावेश झाल्यास मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. या उद्देशानेच राज्यभर ‘बोलींचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलेश लेंडे म्हणाले की, मराठी भाषेची खरी ताकद तिच्या बोलीभाषांमध्ये दडलेली आहे. बोलीभाषा जपल्या गेल्या, तरच आपली सांस्कृतिक ओळख टिकून राहील. त्यामुळे बोलीभाषांकडे मानवतेने, सहानुभूतीने आणि आपलेपणाने पाहण्याची गरज आहे.
मार्गदर्शकांनी नागपुरी व लोधी बोलींचा उगम, वैशिष्ट्ये, लोकजीवनातील स्थान, सांस्कृतिक परंपरा आणि साहित्यिक योगदान यावर सखोल मांडणी केली. बोलीभाषा संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचार मांडण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत लोककलेचे सादरीकरण करण्यात आले. लोककलावंत मिथुन कोठेकर व मंदा कुल्लरकर यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली, तर कवी डॉ. गिरीश सपाटे यांच्या काव्यवाचनाने कार्यक्रमाला साहित्यिक रंग चढला.
हा कार्यक्रम मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेश धर्मदास लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृता इंदुरकर यांनी केले, तर आभार प्रा. प्रज्ञा दुधे यांनी मानले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि भाषाप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला

blank