अर्जुनी मोरगाव,दि.२३ः-येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे नवनिर्मित अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते आज(दि.२३)करण्यात आले.या
लोकार्पण प्रसंगी मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा मिळाल्या पाहिजेत, हिच जिल्हा परिषदेची भूमिका आहे. विज्ञान विषयातील प्रात्यक्षिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढते, संशोधनाची आवड निर्माण होते आणि नवोन्मेषी विचारांना चालना मिळते. आज सुरू झालेली ही प्रयोगशाळा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन ठरेल.”
ते पुढे म्हणाले की, “शालेय स्तरावरच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे ही काळाची गरज असून, भविष्यात संशोधक, अभियंते व शास्त्रज्ञ घडविण्यास अशा सुविधा निश्चितच उपयुक्त ठरतील.”
या कार्यक्रमास पौर्णिमा ढेंगे (सभापती, महिला व बालकल्याण समिती), संदीप कापगते (उपसभापती, पंचायत समिती), उमाकांत ढेंगे (माजी सभापती, जिल्हा परिषद), शालिनी डोंगरवार (पंचायत समिती सदस्य), राजेश पालीवाल, प्रमोद नेवारे (शाळा समिती सदस्य), नलिनी बांडे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), विद्याधर ब्राह्मणकर (सदस्य, शाळा समिती), प्रा. शरद मेश्राम, इंजि. बोपचेजी, के. बी. बनसोड (मुख्याध्यापक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात नवनिर्मित प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, संशोधन व नवकल्पनांच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षक-शिक्षिका, पालकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलांसाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.





