23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home शैक्षणिक गोंदिया जिल्ह्यात ‘बिरसा हेल्थ कार्ड’ अभिनव उपक्रमाचा शुभारंभ

गोंदिया जिल्ह्यात ‘बिरसा हेल्थ कार्ड’ अभिनव उपक्रमाचा शुभारंभ

0
50

आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक पाऊल निरोगी भविष्यासाठी

          गोंदिया, दि.24 : राज्यात गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘बिरसा हेल्थ कार्ड’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात करण्यात आला.

“एक पाऊल निरोगी भविष्यासाठी-आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी” या संकल्पनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या ‘बिरसा हेल्थ कार्ड’द्वारे आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, आजारांची नोंद व संपूर्ण आरोग्यविषयक माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांना विद्यार्थ्यांचा पूर्व वैद्यकीय इतिहास तत्काळ उपलब्ध होऊन अचूक व जलद उपचार करणे शक्य होणार आहे.

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये स्वच्छता, संतुलित आहार, व्यायाम, व्यसनमुक्ती तसेच विविध आजारांबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्य विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आश्रमशाळांमध्ये नर्स उपलब्ध झाल्यामुळे आरोग्यविषयक माहितीचे संकलन व जतन करणे अधिक सुलभ होणार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थी निवासी असल्याने व सिकलसेलसारख्या आजारांचे प्रमाण जास्त असल्याने, आजारपणाच्या वेळी वैद्यकीय इतिहास उपलब्ध नसतो. ‘बिरसा हेल्थ कार्ड’मुळे आता विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य माहिती सहज उपलब्ध होणार असून उपचारांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.

या उपक्रमाचा अनावरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सर्वश्री आमदार संजय पुराम, विनोद अग्रवाल, डॉ.मिलिंद नरोटे (गडचिरोली), जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तानाजी लोखंडे तसेच ‘बिरसा हेल्थ कार्ड’ ज्यांच्या विशेष प्रयत्नातुन साकार झाले अशा सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.सायली चिखलीकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.हा उपक्रम आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या निरोगी व उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे प्रकल्प कार्यालयामार्फत सांगण्यात आले.

blank