गोंदिया :प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान’ अंतर्गत गोंदिया जिल्हा सिकलसेल मुक्त करण्याचे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मदत व जलसंधारण मंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी केले आहे.
सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा, गोंदिया येथे आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभात बोलताना त्यांनी हे आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रशासन, आरोग्य विभाग, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. इंद्रनील नाईक म्हणाले की, सिकलसेल अॅनिमिया हा आजार विशेषतः आदिवासी व ग्रामीण भागात गंभीर स्वरूप धारण करत आहे. या आजाराचे वेळेवर निदान, समुपदेशन व उपचार केल्यास भविष्यातील पिढीला या आजारापासून मुक्त ठेवणे शक्य आहे. यासाठी शासनाच्या वतीने ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत असून, नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
या अभियानाअंतर्गत सिकलसेल तपासणी, जनजागृती, उपचार व समुपदेशन यावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाने तपासणी करून घ्यावी, युवक-युवतींनी विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व ओळखावे तसेच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवी संस्थांचे या अभियानातील योगदानाबद्दल कौतुक केले. “सिकलसेल मुक्त गोंदिया” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी प्रजित नायर (भा.प्र.से.), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,आयईसी विभाग प्रशांत खरात, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ निरंजन अग्रवाल यांचे सह जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या आरोग्यदायी, समृद्ध व सिकलसेल मुक्त भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.





