24.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत सिरेगावबांधतर्फे प्रजासत्ताक दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

ग्रामपंचायत सिरेगावबांधतर्फे प्रजासत्ताक दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

0
25

अर्जुनी-मोर. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील स्मार्टग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत सिरेगावबांध येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिक, माता व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावातील एका व्यक्तीस ‘ग्रामरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षीचा ग्रामरत्न पुरस्कार श्री. मनोहर आत्माराम चिमणकर यांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व ५,००० रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच गावात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत जन्मलेल्या मुलींच्या मातांना प्रत्येकी २,००० रुपये रोख देऊन गौरविण्यात आले. यामध्ये खेमलता दीपक कापगते, प्राची दिनेश चिमणकर, देवांगना मंगेश मरस्कोल्हे, दिव्या मनोज सयाम व चांदनी कुलदीप सुखदेव या पाच मातांचा सन्मान करण्यात आला. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.
ग्रामपंचायत क्षेत्रातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १,००० रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळा सिरेगावबांध येथून नवोदय विद्यालयासाठी निवड झालेले, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये कुमारी क्रेजा हेमकृष्ण संग्रामे, लखन अरुण टेंभुरकर व प्रेमकुमार रेशीम गहाणे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
गावातील माजी विद्यार्थी अ‍ॅड. लालदेव यशवंत नंदेश्वर यांच्या वतीने दरवर्षी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ते ८ मधील सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास १,००० रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येते. यावर्षी हा सन्मान लखन अरुण टेंभुरकर यांना देण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी अशा विविध पुरस्कारांचे आयोजन करून ग्रामपंचायत सिरेगावबांध समाजकार्याची आवड व विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्याचे कार्य करत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, असे उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीने राबवावेत, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व ग्रामपंचायत उपसरपंच इंजि. हेमकृष्ण संग्रामे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश कापगते व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सर्व शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.