
गोंदिया :- नववर्षीच्या पहिल्याच आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमी व स्वामी नरेंद्रनाथ सेवा समिती यांचे एकत्रित सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमी येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या शिबिरात एकूण ८६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमी.चे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी दिली आहे.पालांदुर/जमी येथील स्वामी नरेंद्रनाथ सेवा समिती हे नववर्षाच्या पर्वावर सामाजिक उपक्रम हाती घेण्यात अग्रेसर असते. ह्या वर्षी ग्राम पालांदुर/जमीचे सरपंच जयवंताबाई हरदूले, उपसरपंच निकोडेजी व वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांच्या कल्पक विचारातुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.हे शिबिर डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.या उपक्रमामुळे रक्तसाठा वाढण्यास मदत झाली असून गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होणार आहे. शिबिराप्रसंगी गावातील नवयुवक, स्वामी नरेंद्रनाथ सेवा समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमी.चे आरोग्य कर्मचारी पुढे येवुन मोठ्या हिरीरिने रक्तदान केले. ह्याप्रसंगी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी उपस्थितांना रक्तदानाबाबत माहिती देवुन त्यांच्या रक्तदानाविषयीच्या भ्रामक कल्पना दुर केल्या.रक्तदान शिबीराप्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सर्व रक्तदात्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभि गिर्हेपुंजे,आरोग्य सेविका डोरले, आरोग्य सहाय्यक नितीन रजनकर, आरोग्य सहायिका भावना पुस्तोडे यांचे सह समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




