नवेगावबांध येथे स्लॉथ अस्वलावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत नवेगाव राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलातील डारमेंट्री हॉल येथे १९ ते २३ जानेवारी दरम्यान ५ दिवसीय भारतातील स्लॉथ(आळसी) अस्वलावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला श्रीलंका या देशातील अभ्यासकासह देशातील विविध राज्यातील अभ्यासकांनी हजेरी लावली होती. स्लॉथ बेअर संवर्धनावर विशेष भर देऊन वन्यजीव संशोधनातील प्रगतीवर ८ वे क्षेत्रीय आधारीत राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेचे (प्रशिक्षण) उद्घाटन नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र, क्षेत्र संचालक पियुषा जगताप यांच्या हस्ते १९ जानेवारीला संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र साकोली उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, कार्यशाळेचे आयोजक विभागीय वनाधिकारी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र विभागीय वनाधिकारी साकोली अतुल देवकर, प्रमुख मार्गदर्शक डॉ.निशीथ धारैया, प्रतीक देसाई, सखी दाभी उपस्थित होते.
जगातील अस्वलाच्या एकूण प्रजाती भारतात आढळणारे, आपल्या परिसरात दिसुन येणारे स्लॉथ बेअर ची ओळख करून दिली. त्यांचे खाद्य, वर्तन वागणूक, त्यांच्या पासून बचाव कसा करायचा.एकूणच अस्वलापासून नागरीकांचे संरक्षण कसे करायचे,जेणेकरून मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करणे, तसेच वने व वन्यजीव याबाबत सविस्तर माहिती दिली. सदर कार्यशाळेला विदेशातील श्रीलंका येथुन विद्यार्थी,भारतातील उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, उडिसा, कर्नाटक इ. राज्यातून विद्यार्थी हजर होते.तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्रातील वनरक्षक,वनपाल मोठया संख्यने उपस्थित होते. आयोजीत कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्राधिकारी प्रतिभाताई रामटेके,स्वागताधिकारी प्रमोद पझारे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
स्लॉथ बेअर ही एक भारतीय अस्वल प्रजाती आहे. आळशी अस्वल, झिपरे अस्वल या नावानेही ती ओळखली जाते.संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल.ऋक्ष शब्दाचे ध्वन्यात्मक रूपांतर होऊन अच्छ शब्द अस्तित्वात आला. भल्ल हा शब्दसुद्धा नंतरचा. अच्छभल्ल हा सामासिक शब्द अस्वलवाचक आहे. तो पाली व अर्धमागधी वाङ्मयात आढळतो.अच्छभल्लचे मराठी रूप म्हणजे अस्वलअस्वल हा गलिच्छ, ओंगळवाणा आणि क्रूर प्राणी आहे. स्लॉथ बेअर्स हे सर्वात आक्रमक अस्वलांपैकी एक आहे. स्लोथ अस्वल या अस्वलाचे वैज्ञानिक नाव मेलुरुस युरेनस असे असून याच्या दोन उपप्रजाती आहेत.त्यामध्ये इंडियन स्लोथ अस्वल आणि श्रीलंका असे प्रकार आहेत. तो सस्तन प्राणी जगाच्या बहुतेक सर्व भागांत आढळतो. शरीरावरील दाट केसांमुळे मुळात तो थंड प्रदेशात राहण्याच्याच लायकीचा,तरीही त्याने उष्ण कटिबंधातील वातावरणाशी जुळवून घेतले हे विशेष.





